Parth Pawar Rajya Sabha Oath: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगतउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आज (9 एप्रिल 2026) राज्यसभेच्या सदस्यपदाची अधिकृत शपथ घेतली. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीत ठिकठिकाणी भव्य बॅनरबाजी करून पार्थ पवार यांचे स्वागत करण्यात आले.
दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
पार्थ पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल प्रामुख्याने उपस्थित होते. अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबासाठी आणि पक्षासाठी हा अत्यंत भावूक क्षण होता. पार्थ पवार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताच उपस्थित नेत्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले.
अजित पवारांच्या शैलीतील ‘त्या’ जॅकेटची विशेष चर्चा
या संपूर्ण सोहळ्यात पार्थ पवार यांच्या पेहरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पार्थ पवार यांनी यावेळी हुबेहूब त्यांचे वडील दिवंगत अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान केले होते. अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमात ज्या प्रकारचे जॅकेट वापरायचे, अगदी तसाच पेहराव करून पार्थ पवारांनी सभागृहात प्रवेश केला. यामुळे उपस्थितांमध्ये आणि राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. वडिलांच्या आठवणींना आणि त्यांच्या राजकीय वारशाला अशा प्रकारे उजाळा दिल्याने या सोहळ्याला एक वेगळाच भावनिक रंग चढला होता.
राजकीय वर्तुळात उमटले पडसाद
अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्यसभेच्या माध्यमातून आता ते दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यांच्या शपथविधीच्या वेळी दाखवलेली ही ‘अजित पवार स्टाईल’ केवळ पेहरावापुरती मर्यादित नसून, ते वडिलांचाच वारसा समर्थपणे पुढे नेणार असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला असल्याचे बोलले जात आहे. या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवचैतन्य संचारले आहे.