Imtiaz Jaleel: नाशिकमधील गाजलेल्या धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकेवरून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय युद्ध पेटले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएम (MIM) आणि इम्तियाज जलील यांच्यावर केलेल्या आरोपांना जलील यांनी शुक्रवारी सडेतोड उत्तर दिले. “एखाद्याचे नाव एफआयआरमध्ये आले किंवा कोर्टाने जामीन नाकारला, म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी निदा खानची पाठराखण केली आहे.
शिरसाटांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर
निदा खान हिला एमआयएमच्या एका नगरसेवकाच्या घरातून अटक केल्यानंतर संजय शिरसाट यांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट इम्तियाज जलील यांच्याशी जोडले होते. यावर बोलताना जलील म्हणाले, “संजय शिरसाट हे पोलीस तपास अधिकारी आहेत का? जे माझ्यावर आरोप करत आहेत, त्यांनी स्वतःवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या वेळी सीबीआय चौकशीची मागणी का केली नव्हती?” असा रोकडा सवाल त्यांनी विचारला. आमच्या शहरात एखादी मुलगी सापडली म्हणून तिचा संबंध थेट माझ्याशी जोडणे हे केवळ राजकीय द्वेषापोटी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
न्यायव्यवस्थेचा दाखला आणि ‘मीडिया ट्रायल’वर ओढले ताशेरे
निदा खानला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याच्या मुद्द्यावर इम्तियाज जलील यांनी कायद्याची बाजू मांडली. ते म्हणाले, “जोपर्यंत न्यायालय अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत संशयित व्यक्ती ही निष्पापच मानली जाते. जामिनासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर या मुलीचा संबंध दहशतवाद्यांशी असता, तर पोलिसांनी आतापर्यंत ‘लूकआऊट नोटीस’ किंवा अजामीनपात्र वॉरंट काढले असते. तिच्यावर केवळ धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप आहेत, मग तिला मोठी मारेकरी असल्यासारखे का वागवले जात आहे?” गेल्या काही वर्षांत देशात आरोप होताच एखाद्याला गुन्हेगार ठरवण्याची चुकीची पद्धत सुरू झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काय आहे प्रकरण?
नाशिकमधील एका धर्मांतरण प्रकरणात निदा खान ही संशयित आरोपी आहे. अनेक दिवसांपासून पोलीस तिच्या शोधात होते. अखेर छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या निवासस्थानातून तिला ताब्यात घेण्यात आले. या अटकेनंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. “न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. जर कोणी दोषी असेल तर पोलीस तपास करतील आणि कारवाई होईल. पण आरोप झाले म्हणून कुणालाही फासावर लटकवणे योग्य नाही,” असे म्हणत जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.