Ulhas Bagul Join Shinde Shiv Sena: पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा ऊर्फ उल्हास बागुल यांनी आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबईत पार पडला.
काँग्रेसला खिंडार, 30 वर्षांची साथ सुटली
उल्हास बागुल यांनी गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसमध्ये विविध पदे भूषवली आहेत. ते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि महापालिकेतील अनुभवी चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबत बागुल कुटुंबीय आणि पुणे महापालिकेतील अनेक माजी लोकप्रतिनिधींनीही ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्याने पुण्यात काँग्रेसची मोठी हानी झाली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून ‘आबां’चे जंगी स्वागत
पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी उल्हास बागुल यांचे तोंडभरून कौतुक केले. बागुल यांनी 30 वर्षे सार्वजनिक जीवनात काम केले आहे. स्लम फ्री पुणे आणि स्लम फ्री महाराष्ट्र हे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या कामाची पद्धत पाहूनच आबांनी हा निर्णय घेतला आहे. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कोणी मालक किंवा नोकर नाही, अशा शब्दांत त्यांनी बागुल यांना आश्वस्त केले.
पुणे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी आणि माझे सरकार पूर्णपणे बागुल यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही यावेळी शिंदेंनी दिली. विधानसभेच्या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही, तोच महापालिका निवडणुकीपूर्वी हा दुसरा मोठा हादरा असल्याचेही त्यांनी नमूद केले.