PMC Election Results 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात आज एक अत्यंत खळबळजनक निकाल समोर आला आहे. पुण्याच्या नाना पेठ-गणेश पेठ पट्ट्यात (प्रभाग 23) 'आंदेकर गँग'शी संबंधित असलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिकिटावर मोठा विजय मिळवला आहे. या हाय-प्रोफाइल लढतीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे.
जेलमधील उमेदवारांनी मारली बाजी
पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या आयुष कोमकर मृत्यू प्रकरणात आणि खंडणीच्या गुन्ह्यात सध्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या तुरुंगात आहेत. न्यायालयातून विशेष परवानगी मिळवून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रभाग 23 मध्ये एकूण 4 जागा होत्या. त्यापैकी 2 जागांवर आंदेकर भगिनींनी (राष्ट्रवादी) विजय मिळवला, तर उर्वरित 2 जागा भाजपने खिशात घातल्या.
धंगेकरांना मोठा धक्का
या प्रभागात प्रतिभा धंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात होता, मात्र सोनाली आंदेकर यांनी त्यांना मोठ्या फरकाने मागे टाकल्याने धंगेकर समर्थकांमध्ये शांतता पसरली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निवडणुकीपूर्वी सडकून टीका झाली होती. पुणे गुन्हेगारीमुक्त करू असे आश्वासन देणाऱ्या अजित पवारांनी थेट 'मोक्का' अंतर्गत कारवाई झालेल्या आणि हत्येचा आरोप असलेल्या कुटुंबाला उमेदवारी दिल्याने भाजपनेही त्यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, मतदारांनी दिलेल्या या निकालामुळे गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील युतीवर पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
गुन्हेगारी वर्चस्वाचा नवा अध्याय?
दरम्यान, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी असलेल्या सोनाली आणि त्यांच्या नातेवाईक लक्ष्मी आंदेकर आता महापालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत. या विजयानंतर पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, तुरुंगातून निवडणूक जिंकल्याने आंदेकर टोळीचा स्थानिक प्रभाव किती खोलवर आहे, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.