BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ईशान्य मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी गटनेते आणि ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यांने साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तिकीट कापल्याने संताप
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय पिसाळ यांचा बालेकिल्ला असलेला वॉर्ड युतीमध्ये शिवसेना (UBT) कडे गेल्याने त्यांचे तिकीट कापले गेले होते. आपल्या हक्काची जागा मित्रपक्षाला सोडल्याने पिसाळ प्रचंड नाराज होते. "निष्ठावंतांचे तिकीट कापून जागा लादल्या जात आहेत," असा सूर लावत त्यांनी अखेर घड्याळ बदलण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – BMC Election 2025 : मुंबईत 'मविआ'चं नवं समीकरण! शरद पवार गट अखेर ठाकरे बंधूंसोबत; किती जागा मिळणार?
आणखी बडे मासे गळाला लागण्याची शक्यता
धनंजय पिसाळ यांच्यानंतर आता शरद पवार गटात मोठी गळती लागण्याची चिन्हे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार: आरिफ सय्यद (दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष) हे देखील लवकरच अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच मनीषा राहाटे (माजी नगरसेविका) यादेखील पक्षाला सोडचिठ्ठी देऊन महायुतीच्या गोटात सामील होऊ शकतात.
हेही वाचा – Gautam Adani And Sharad Pawar : 'शरद पवार माझे मार्गदर्शक…'; गौतम अदानींच्या वक्तव्यानं खळबळ
युतीमुळे 'इच्छुकांची' अडचण
दरम्यान, मुंबई महापालिकेत शरद पवार गटाने शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. या युतीमुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ 10 ते 12 जागा येण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा हा आकडा अत्यंत कमी असल्याने अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुकांचे तिकीट कापले जाणार आहे. याच नाराजीतून आता 'आऊटगोइंग'चा ओघ वाढला आहे.