Ambernath Municipal Council: अंबरनाथ नगरपालिकेत सत्तास्थापनेच्या गणितावरून सुरू झालेला अंतर्गत कलह आता काँग्रेसच्या मुळावर आला आहे. भाजपसोबत छुपी युती केल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवकांनी बंडाने उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या तब्बल 12 नवनिर्वाचित नगरसेवकांनी आता अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा सोहळा पार पडला.
नेमका वाद काय?
अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे 12 उमेदवार विजयी झाले होते. मात्र, पक्षश्रेष्ठींना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्थानिक पातळीवर या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे सांगत वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले. या कारवाईमुळे संतापलेल्या नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत थेट कमळ हाती घेण्याचे निश्चित केले.
या सामूहिक पक्षांतरात प्रदीप नाना पाटील, दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, विपुल पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड यांचा समावेश आहे. या मोठ्या गटाच्या बाहेर पडण्यामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
सचिन सावंतांचा भाजपवर निशाणा
या घडामोडींवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी तत्त्व आणि विचार गुंडाळून ठेवणारा पक्ष आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना गळाला लावणारी भाजप अकोटमध्ये चक्क एमआयएमसोबत हातमिळवणी करते, असा टोला त्यांनी लगावला.