Ajit Pawar Kavya Gauravgranth: महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि लोकसेवेचा गौरव करण्यासाठी एक आगळावेगळा साहित्यिक उपक्रम राबवण्यात आला आहे. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार’ या विशेष काव्य गौरवग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा पट आता कवितेच्या स्वरूपात उलगडणार आहे. या ग्रंथात देशातील विविध राज्यांतील 156 कवींनी आपल्या रचनांतून अजितदादांना मानवंदना दिली आहे. एकाच नेत्याच्या कार्यावर आधारित एवढ्या मोठ्या प्रमाणावर कवींनी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
साहित्य आणि राजकारणाचा अपूर्व संगम
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ आणि गोवा यांसारख्या राज्यांतील नामवंत व नवोदित कवींनी यात सहभाग नोंदवला आहे. विविध भाषिक प्रदेशांतील मराठी कवींनी यात योगदान देऊन अजितदादांच्या कार्याची व्याप्ती अधोरेखित केली आहे.
29 मे रोजी धाराशिवमध्ये रंगणार प्रकाशन सोहळा
या ऐतिहासिक ग्रंथाचा लोकार्पण सोहळा 29 मे 2026 रोजी धाराशिव येथे पार पडणार आहे. 32 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या गौरवग्रंथाचे प्रकाशन होणार असून, यावेळी साहित्यिकांची मोठी मांदियाळी उपस्थित राहणार आहे.
ग्रंथाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्ये
अजित पवार यांची कामाची शिस्त, झटपट निर्णय घेण्याची पद्धत आणि विकासात्मक दृष्टीकोन यावर कवींनी प्रकाश टाकला आहे. हा ग्रंथ केवळ कवितांचा संग्रह नसून, तो एका लोकनेत्याच्या राजकीय प्रवासाचा साहित्यिक दस्तावेज ठरेल. आयोजकांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारे एखाद्या नेत्याच्या गौरवार्थ 150 हून अधिक कवींनी एकत्र येऊन ग्रंथ साकारणे, ही एक दुर्मिळ आणि कौतुकास्पद घटना आहे. या सोहळ्यामुळे धाराशिवमध्ये साहित्यिकांचा मेळा भरणार असून, राजकीय आणि साहित्यिक वर्तुळात या ग्रंथाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.