Dharashiv Accident : कळंब-लातूर रस्त्यावर एका भीषण 'हिट अँड रन'च्या घटनेने खळबळ उडाली आहे. भरधाव कारने रस्त्याने पायी चालणाऱ्या 7 ऊसतोड कामगारांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 4 मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारसह चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मंगरूळ गावचे काही ऊसतोड मजूर शेतातून कळंब बाजाराच्या दिशेने पायी निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने या मजुरांना उडवले. ही धडक इतकी जोरात होती की, मजूर रस्त्याच्या कडेला फेकले गेले. घटनेनंतर चालक मदतीसाठी न थांबता वाहन घेऊन पसार झाला.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघातात जखमी झालेल्या 6 मजुरांना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 4 जण अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे सर्व मजूर आदिवासी पारधी समाजाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींची ही अवस्था पाहून नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण सुन्न झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कारवर लातूर जिल्ह्याचा पासिंग नंबर होता. त्यामुळे अपघातग्रस्त कार आणि चालक लातूर जिल्ह्यातील असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात पोहोचून जखमींचे जबाब नोंदवले आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
दरम्यान, कळंब पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे फरार कारचालकाचा शोध घेत आहेत. नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असून, लवकरच आरोपीला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.