Amol Mitkari: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन खळबळजनक दावे केले आहेत. अजित दादांच्या अपघाताला 4 महिने उलटूनही तपासाला अपेक्षित गती का मिळत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
विमान अपघातामागे अघोरी पूजेचे कनेक्शन?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या 3 महिन्यांपूर्वीपासून बारामती आणि परिसरात काही संशयास्पद प्रकार घडल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. काटेवाडीतील बंगल्याच्या मागे, वझुबावी परिसर आणि देवगिरी बंगल्याच्या भोवती अघोरी पूजा केल्याचे प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले. “मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता आहे, पण ज्या पद्धतीने भोंदू बाबा अशोक खरात याच्या आश्रमात हालचाली सुरू होत्या, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे,” असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ आणि सीसीटीव्ही फुटेज
या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे म्हणून मिटकरी यांनी पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज सोपवले आहेत. तसेच, लवकरच एक महत्त्वाचा ‘पेन ड्राईव्ह’ देखील तपास यंत्रणांना दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्या प्रतिष्ठान परिसर, सहयोग बंगला आणि काटेवाडीतील खताळ पट्ट्यात उलटा बोकड कापून केलेली अघोरी पूजा, हे सर्व प्रकार जाणीवपूर्वक घडवले गेले का? आणि यामध्ये बारामतीमधीलच काही लोकांचे सहकार्य होते का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तपासात दिरंगाई झाल्यास आंदोलनाचा इशारा
तपास यंत्रणांच्या संत गतीवर मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जर 1 महिन्यात या तपासात सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर मी पुढील पाऊल उचलेन,” असा इशारा त्यांनी दिला आहे. अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या जनतेला सत्य कळावे यासाठी आपण हे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘जस्टीस फॉर दादा’ : लवकरच संघर्ष यात्रा
तपास यंत्रणांकडून स्पष्टता मिळत नसल्यामुळे आता हा लढा जनतेमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय मिटकरी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी ‘अजितदादा न्याय संघर्ष यात्रा’ (Justice For Dada) काढण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन या यात्रेचे स्वरूप आणि तारीख जाहीर करण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर सत्य मांडण्याचा निर्धार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.