BJP Working President: भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचा निर्णय घेत बिहार सरकारचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटन आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत नितीन नबीन यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
नितीन नबीन हे सध्या बिहार सरकारमध्ये रस्ते बांधकाम आणि नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. ते पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी आतापर्यंत पाच वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटप, प्रचार नियोजन आणि व्यवस्थापनातही त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. याशिवाय, त्यांनी छत्तीसगडमध्ये भाजपचे राज्य प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
पक्षाच्या सूत्रांनुसार, नितीन नबीन यांच्या अनुभवाचा लाभ राष्ट्रीय पातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यासाठी होईल. त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या धोरणात्मक निर्णयांना अधिक धार मिळेल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्रिय आणि संघटित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Ramdas Athawale on Uddhav Thackeray: राज ठाकरेंची साथ उद्धव ठाकरेंना भोवणार; रामदास आठवलेंचा मोठा दावा
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नितीन नबीन म्हणाले की, पक्षाने दिलेली जबाबदारी ते पूर्ण निष्ठेने पार पाडतील आणि भाजपची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नितीन नबीन यांचे अभिनंदन केले. बिहारच्या भूमीतून नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे याबद्दल आभार, असेही त्यांनी नमूद केलं आहे. या नियुक्तीमुळे भाजपमध्ये बिहारच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर अधिक बळ मिळाल्याचे मानले जात आहे.