Kagal Corridor on NH-48 : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल शहराचा कायापालट करणारी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग-48 (NH-48) वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 357.99 कोटी रुपयांच्या 6-पदरी (6-lane) एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामाला केंद्राने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि कर्नाटक सीमेवरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
6-पदरी कॉरिडॉर आणि 3-पदरी सर्व्हिस रोड
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत कागल शहरातून जाणाऱ्या महामार्गावर 6-पदरी उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या दोन्ही बाजूंना 3-पदरी (3-lane) काँक्रीट सर्व्हिस रस्तेही तयार केले जातील. राष्ट्रीय महामार्ग-48 हा दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांना जोडणारा ‘गोल्डन क्वाड्रिलॅटरल’चा महत्त्वाचा हिस्सा आहे. या नवीन प्रकल्पामुळे महामार्गावरील लांब पल्ल्याची वाहतूक आणि स्थानिक वाहतूक वेगळी होईल, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन इंधनाचीही मोठी बचत होईल.
औद्योगिक क्षेत्राला आणि मालवाहतुकीला गती
कागल येथे प्रसिद्ध 5-स्टार एमआयडीसी (MIDC) औद्योगिक क्षेत्र असल्याने या भागात अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्या या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या जाणवत आहे, ज्याचा परिणाम रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन सेवांवरही होतो. नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे मालवाहतूक अधिक कार्यक्षम होईल आणि उद्योगांना लागणारा कच्चा माल व उत्पादित मालाची ने-आण जलद गतीने शक्य होईल. यामुळे परिसरातील आर्थिक उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होणार आहे.
कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख! कागलमध्ये ₹357.99 कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर! कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी!
₹357.99 कोटींच्या या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून… https://t.co/teBTaxSFEE — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 14, 2026
प्रदूषण मुक्ती आणि वेळेची बचत
वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना सध्या तासनतास कागलमध्ये अडकून पडावे लागते. उन्नत महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. स्थानिक नागरिकांना सर्व्हिस रोडमुळे शहरांतर्गत प्रवास करणे सोपे जाईल, तर महामार्गावरील प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येईल. या प्रकल्पामुळे कागल शहराच्या पायाभूत सुविधांना जागतिक दर्जा मिळेल आणि पर्यायाने संपूर्ण दक्षिण महाराष्ट्राच्या प्रगतीला नवा वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.