Bhiwandi Municipal Election 2026: भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने (भाजप) विरोधकांना धोबीपछाड दिली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे भाजपचे तब्बल 5 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, याआधीच्या एका जागेसह भाजपने विजयाचा 'छक्का' मारला आहे. या विजयामुळे भिवंडीच्या राजकारणात भाजपचे पारडे जड झाले आहे.
मुस्लिम उमेदवाराचा बिनविरोध विजय
या निवडणुकीत भाजपने केवळ राजकीय ताकदच दाखवली नाही, तर सामाजिक समीकरणांतही बाजी मारली आहे. प्रभाग 18 (क) मधून अबूसूद अशफाक अहमद शेख हे भाजपच्या तिकिटावर बिनविरोध निवडून आले आहेत. केरळमधील त्रिशूर पॅटर्नची आठवण करून देणारा हा विजय महाराष्ट्रातील भाजपच्या समावेशक राजकारणाचे नवे उदाहरण मानले जात आहे.
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार
अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणी विरोधकांनी माघार घेतल्याने पुढील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला: 1. अश्विनी सन्नी फुटाणकर (प्रभाग 18 अ) 2. दीपा दीपक मढवी (प्रभाग 18 ब) 3. अबूसूद अशफाक अहमद शेख (प्रभाग 18 क) 4. परेश (राजू) चौघुले (प्रभाग 16 अ) 5. भारती हनुमान चौधरी (प्रभाग 23 ब) (टीप: यापूर्वी सुमित पाटील यांनी बिनविरोध विजयाचे खाते उघडले होते.)
महापौरपदाच्या दिशेने पहिली झेप
सुमित पाटील यांच्या विजयाने सुरू झालेली ही मालिका आता 6 जागांपर्यंत पोहोचली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. हा विजय म्हणजे आगामी महापौर भाजपचाच होणार याची नांदी आहे, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला आहे.