Rahul Gandhi: ‘मी मोदींना घाबरत नाही, माझ्यावर 36 खटले दाखल…’; बंगालमधील सभेत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

मेटियाब्रुज येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीवर निशाणा साधला.

Rahul Gandhi:  ‘मी मोदींना घाबरत नाही, माझ्यावर 36 खटले दाखल…’; बंगालमधील सभेत राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

Rahul Gandhi:  काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर, कोलकाता आणि मेटियाब्रुज येथे आयोजित जाहीर सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मेटियाब्रुज येथील सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या दडपशाहीवर निशाणा साधला. “माझ्यावर सध्या 36 खटले दाखल आहेत, तरीही मला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटत नाही,” असे धाडसी विधान त्यांनी यावेळी केले. भाजप आणि RSS च्या विचारसरणीविरुद्ध आपला लढा अहोरात्र सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

‘केवळ काँग्रेसच भाजपचा पराभव करू शकतो’
भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी देशभरात लोकशाहीवर हल्ला करत असून मतांची चोरी करत आहेत. जो कोणी भाजप आणि RSS विरोधात उभा राहतो, त्याच्यावर हल्ले केले जातात. “मी प्रत्येक राज्यात भाजपच्या विचारसरणीविरुद्ध लढतो, म्हणूनच माझ्यावर सतत हल्ले होतात. मात्र, काँग्रेस हा विचारसरणीवर आधारित पक्ष असल्याने आम्ही भाजपशी कोणतीही तडजोड करणार नाही. केवळ काँग्रेसच भाजपला पराभूत करू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ममता बॅनर्जींवर भ्रष्टाचाराचे आणि बेरोजगारीचे आरोप
राहुल गांधी यांनी केवळ केंद्रावरच नव्हे, तर राज्यातील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवरही गंभीर आरोप केले. ममता बॅनर्जी यांनी बेरोजगारी संपुष्टात आणण्याचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे ते म्हणाले. “गेल्या निवडणुकीत त्यांनी 5 लाख तरुणांना रोजगार देण्याचे वचन दिले होते, मात्र आज बंगालमध्ये 84 लाख बेरोजगार तरुणांनी भत्त्यासाठी अर्ज केले आहेत,” अशी आकडेवारी त्यांनी मांडली. ‘सारधा’ आणि ‘चिट फंड’ सारख्या घोटाळ्यांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील भ्रष्टाचार आणि गुंडगिरीच्या वाढत्या जाळ्यावर चिंता व्यक्त केली.

हेही वाचा – Priyanka Kakkar: ‘केजरीवाल यांची बदनामी करण्याचा भाजपचा कट…’; बनावट फोटोंवरून प्रियांका कक्कर यांचा राघव चढ्ढांसह मोदींवर निशाणा

‘ममता बंगालमध्ये भाजपसाठी मार्ग मोकळा करत आहेत’
राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपला मदत करत असल्याचा खळबळजनक आरोप केला. “ममता बॅनर्जी योग्य प्रकारे सरकार चालवत नाहीत आणि विकास करण्यात अपयशी ठरल्या आहेत, यामुळेच राज्यात भाजपसाठी मार्ग मोकळा होत आहे. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या TMC आणि भाजप या दोन्ही पक्षांनी बंगालच्या जनतेचे अतोनात नुकसान केले आहे,” असे ते म्हणाले. भ्रष्टाचार आणि अराजकतेमुळे जनता भरडली जात असताना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी शेवटी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number