Unopposed Candidates List: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत महायुतीने विरोधकांवर मोठी आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर कल्याण-डोंबिवली, भिवंडी, पनवेल आणि धुळे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महायुतीचे 17 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या जागांवर मतदानाची गरज उरली नसून महायुतीच्या गोटात जल्लोषाचे वातावरण आहे.
केडीएमसीमध्ये युतीचा दबदबा
सर्वात मोठे यश कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) मिळाले आहे. येथे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोघांनी मिळून 9 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. यामुळे 122 सदस्यसंख्या असलेल्या या सभागृहात सत्तेच्या दिशेने युतीने भक्कम पाऊल टाकले आहे.
राज्यातील बिनविरोध विजयी उमेदवारांची अधिकृत यादी
राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये महायुतीने मतदानापूर्वीच आपला विजयाचा झेंडा फडकावला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने प्रभाग 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी आणि पॅनल 28 (अ) मधून हर्षल मोरे यांनी बाजी मारली आहे. याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ज्योती पाटील (प्रभाग 24 ब), मंदा पाटील (पॅनल 27 अ), रेखा चौधरी (प्रभाग 18), आसावरी नवरे (प्रभाग 26 क) आणि रंजना पेणकर (प्रभाग 26 ब) या पाच महिला उमेदवारांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.
जळगावमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचा वरचष्मा पाहायला मिळाला, जिथे प्रभाग 9 (अ) मधून मनोज चौधरी, प्रभाग 9 (ब) मधून प्रतिभा देशमुख आणि गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. धुळे महानगरपालिकेत भाजपने तीन जागांवर वर्चस्व मिळवले असून सुरेखा उगले (प्रभाग 17 ब), उज्ज्वला भोसले (प्रभाग 1 अ) आणि ज्योत्स्ना पाटील (प्रभाग 6 ब) या विजयी ठरल्या आहेत. याशिवाय, भिवंडीतून भाजपचे सुमीत पाटील (वॉर्ड 17 ब) आणि पनवेलमधून नितीन पाटील (प्रभाग 18 ब) यांनी बिनविरोध विजयाची नोंद केली आहे. अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर यश मिळवले असून प्रभाग 11 मधून कुमारसिंह वाकळे आणि प्रभाग 14 मधून प्रकाश भागानगरे हे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
हेही वाचा – KDMC Election 2026 : सेनेनं खातं उघडलं!; कल्याण – डोंबिवलीत शिवसेनेचे 3 नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी
सत्तेचे समीकरण आणि वर्चस्व
या यशामुळे भाजपचे 10, शिवसेना (शिंदे गट) 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) 2 उमेदवार विजयी झाले आहेत. जळगावमध्ये शिवसेनेने तर धुळे आणि पनवेलमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या बिनविरोध निवडींमुळे संबंधित वॉर्डांमध्ये महायुतीची संघटनात्मक ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले असून, आता सर्वांचे लक्ष उर्वरित जागांच्या प्रत्यक्ष मतदानाकडे लागले आहे.