Rohit Pawar On Sharad Pawar Health: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत गेल्या काही तासांपासून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता आमदार रोहित पवार यांनी खुद्द पवार साहेबांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. “पवार साहेबांची तब्येत आता पूर्णपणे नॉर्मल असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले असून सध्या ते एका प्रायव्हेट रूममध्ये विश्रांती घेत आहेत,” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
सततचा प्रवास आणि शारीरिक तणावामुळे त्रास
गेल्या 12 ते 13 दिवसांपासून शरद पवार सातत्याने विविध ठिकाणी दौरे करत होते आणि कार्यकर्त्यांना भेटत होते. या प्रचंड धावपळीमुळे त्यांना शारीरिक थकवा (Physical Stress) जाणवत होता. रोहित पवार यांनी सांगितले की, या दगदगीमुळे त्यांना काही प्रमाणात कफ झाला आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांचे काही रिपोर्ट्स तपासले असून, येत्या 1 ते 2 दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना खासगी गाडीने मुंबईतील निवासस्थानी हलवण्यात येईल.
कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन
शरद पवारांच्या प्रकृतीची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावर रोहित पवार यांनी कळकळीची विनंती केली आहे की, “रुग्णालयात इतरही रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांच्या सोयीसाठी आणि हॉस्पिटल प्रोटोकॉल पाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी कृपया येथे गर्दी करू नये.” सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयांच्या वतीने त्यांनी स्पष्ट केले की, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सध्या कोणालाही पवार साहेबांची भेट घेता येणार नाही.