Political Crisis: तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात येत्या काळात मोठा भूकंप होण्याची चिन्हे असून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या AIADMK ला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाने विरोधकांना खिंडार पाडण्यासाठी अंतर्गत पातळीवर 'ऑपरेशन एल' ही गुप्त मोहीम आखली आहे. या रणनीतीनुसार, AIADMK चे साधारण 10 आमदार येत्या 15 ऑगस्टपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सत्ताधारी पक्षात प्रवेश करू शकतात.
निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर करण्यापूर्वीच या आमदारांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले असून, त्यानंतर ते TVK च्या चिन्हावर पुन्हा निवडणूक लढवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे उपेक्षित राहिलेले अनेक मोठे नेते आता विजय यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पक्षबदलाचा मार्ग स्वीकारत आहेत.
बहुमताच्या आकड्यासाठी रणनीती;
एकूण 234 सदस्य संख्या असलेल्या तमिळनाडू विधानसभेत सध्या 7 जागा रिक्त असल्याने एकूण संख्याबळ 227 वर आले आहे. यामध्ये सत्ताधारी TVK कडे सध्या 107 आमदारांचे बळ असून, आगामी पोटनिवडणुका जिंकून स्वतःच्या बळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. या राजकीय भूकंपाच्या पुढच्या टप्प्यात जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला एस.पी. वेलुमणी आणि सी.व्ही. शण्मुगम यांच्यासारखे AIADMK चे मातब्बर नेतेही पक्षात येण्याची शक्यता आहे.
पक्ष बदलणाऱ्या आमदारांना केवळ उमेदवारीचीच नाही, तर पुन्हा निवडून आल्यावर मंत्रिमंडळात स्थान किंवा संघटनेत जिल्हा सचिव व जिल्हाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे देण्याचे आश्वासन दिले जात आहे. दरम्यान, विरोधकांनी TVK वर 'पॉलिटिकल वॉशिंग मशीन' अशी टीका करत केंद्रीय तपास यंत्रणांच्या भीतीपोटी आणि प्रलोभनांमुळे हे प्रवेश होत असल्याचा आरोप केला आहे, तर TVK ने हे सर्व आरोप फेटाळून लावत राज्यातील स्थैर्यासाठीच पक्षाचा विस्तार केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.