Suryakumar Yadav: टी-20 विश्वचषक 2026 च्या जेतेपदावर भारताचे नाव कोरणारा ‘कॅप्टन कूल’ सूर्यकुमार यादव मंगळवारी आपल्या मुंबईतील घरी परतला. मायदेशात विश्वचषक जिंकून देणारा पहिला भारतीय कर्णधार ठरलेल्या सूर्याचे देवनार येथील त्याच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी केवळ चाहतेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही त्याची गळाभेट घेत त्याचे अभिनंदन केले.
ढोल-ताशांचा गजर अन् औक्षण
सूर्यकुमार यादव ज्या सोसायटीत राहतो, तिथेच माजी खासदार राहुल शेवाळे यांचेही निवासस्थान आहे. मंगळवारी दुपारी सूर्या घरी पोहोचताच शेवाळे कुटुंबीय, सोसायटीचे सदस्य आणि शिवसैनिकांनी त्याचे जंगी स्वागत केले. भारतीय परंपरेनुसार सूर्याचे औक्षण करून विजयाचा टिळा लावण्यात आला, तसेच पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक ‘सूर्या-सूर्या’च्या घोषणा देत उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण परिसर क्रिकेटमय झाला होता.
सचिन तेंडुलकरचा तो ‘गुरुमंत्र’ कामी आला
विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमारने आपल्या यशाचे गुपित उलगडले. तो म्हणाला, “स्पर्धेपूर्वी मी सचिन तेंडुलकर सरांना भेटलो होतो. त्यांनी मला आयसीसी स्पर्धांमध्ये दडपण न घेता धैर्याने खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा तो विश्वासच आम्हाला विजेतेपदापर्यंत घेऊन गेला.” 30 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सूर्याने अवघ्या 5 वर्षांत भारताला तिसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून देत इतिहास रचला आहे.
सूर्यकुमारने सांगितलं पुढचं लक्ष्य
टी-20 वर्ल्ड कपच्या जेतेपदानंतर आता सूर्याने आपली नजर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर वळवली आहे. “आमचे पुढील स्वप्न भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे आहे. तसेच 2028 मध्ये टी-20 विश्वचषकाची ‘हॅटट्रिक’ साधण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू,” असा निर्धार त्याने व्यक्त केला. भारताचे हे सलग दुसरे विजेतेपद असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा आता अधिक वाढल्या आहेत.
टीम इंडियाचा ‘अजिंक्य’ प्रवास
या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने अत्यंत वर्चस्वपूर्ण कामगिरी केली. साखळी फेरीत पाकिस्तान, अमेरिका आणि नेदरलँडला धूळ चारल्यानंतर सुपर-8 मध्ये काही अडथळे आले होते. मात्र, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत भारताने सेमीफायनल गाठली. उपांत्य फेरीत इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केल्यानंतर, फायनलमध्ये न्यूझीलंडसमोर 255 धावांचे डोंगर उभे करत भारताने 96 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.