Hong Kong Sixes 2025: क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा 7 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 12 संघ 29 सामन्यांत आमनेसामने येणार आहेत. सर्व सामने टिन क्लेंग रोड रिक्रिएशन ग्राउंड, हाँगकाँग येथे खेळले जाणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला
क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:05 वाजता (भारतीय वेळ) रंगणार आहे. दोन्ही संघ गट क मध्ये असून कुवेत या तिसऱ्या संघासह स्पर्धा करणार आहेत. भारतीय संघाचा पुढील सामना 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:40 वाजता कुवेतविरुद्ध खेळवला जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील, त्यानंतर नॉकआउट सामने होतील.
हाँगकाँग सिक्सेस 2025 संघ विभागणी
पूल A: दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, नेपाळ
पूल B: ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युएई
पूल C: भारत, पाकिस्तान, कुवेत
पूल D: श्रीलंका, बांगलादेश, हाँगकाँग
भारतीय संघाची घोषणा
हाँगकाँग सिक्सेससाठी भारतीय संघाचे नेतृत्व माजी विकेटकीपर-फलंदाज दिनेश कार्तिक करणार आहे. संघात अनुभवी खेळाडू आणि नवोदितांचा समतोल संघ तयार करण्यात आला आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक (कर्णधार), स्टुअर्ट बिन्नी, रॉबिन उथप्पा, शाहबाज नदीम, प्रियांक पांचाळ, भरत चिपली या खेळाडूंचा समावेश आहे.
सामना कुठे आणि कसा पाहायचा?
क्रिकेट चाहत्यांसाठी सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि डिजिटल स्ट्रीमिंग दोन्ही उपलब्ध आहेत. सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील, सोनी लिव्ह अॅप आणि फॅनकोड अॅपवर ऑनलाइन स्ट्रीमिंग उपलब्ध आहे. तसेच चाहते हे सामने क्रिकेट हाँगकाँगच्या यूट्यूब चॅनेलवर देखील लाईव्ह पाहू शकतात.