Mumbai Water Cut: मुंबई महानगरपालिकेकडून 2,400 मिमी व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्ती व सुधारणांचे काम हाती घेण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी पालिकेने अंशतः शटडाउन जाहीर केले असून, मंगळवार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवार 12 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत हे काम चालणार आहे. या 24 तासांच्या कालावधीत K दक्षिण आणि संपूर्ण H पूर्व वॉर्डमध्ये पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होणार आहे.
पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, H पूर्व वॉर्डमध्ये पुरवठा पूर्णतः बंद राहील, तर K दक्षिण मधील बामनवाडा, पारसीवाडा, चाकळा, विजय नगर, मोगरपाडा आणि सहार गाव अशा विविध परिसरांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत कमी दाबाने पाणी दिले जाईल. या काळात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), सांताक्रूझ पूर्व, वांद्रे टर्मिनस आणि विमानतळ परिसरात पाणी अजिबात मिळणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पुरेशा प्रमाणावर पाणी साठवून ठेवण्याचे आणि पाणी उकळून-गाळून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
तलावांमध्ये 88.76 टक्के पाणीसाठा उपलब्ध
जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहरात ही तात्पुरती पाणी कपात होत असली, तरी मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावांमधील एकूण जलसाठा समाधानकारक स्थितीत आहे. गुरुवार 6 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, जलाशयांमध्ये एकूण 12,84,608 दशलक्ष लिटर म्हणजेच 88.76 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
यामध्ये मोडक सागर, विहार आणि तुळसी हे तलाव 100 टक्के भरले आहेत, तर तानसा तलावात 99.42 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. याशिवाय मध्य वैतरणा तलावात 91.99 टक्के, भातसा तलावात 86.28 टक्के आणि अप्पर वैतरणामध्ये 78.83 टक्के पाणी साचले आहे. तलावांमधील पाणीसाठा पुरेसा असला, तरी जलवाहिनीच्या आवश्यक देखभालीसाठी पालिकेने हे शटडाउन घेतल्याचे स्पष्ट केले आहे.