Vijay Hazare Trophy: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली लवकरच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरणार आहे. ही मालिका विराटसोबतच कर्णधार रोहित शर्मासाठीही निर्णायक मानली जात आहे. मालिकेनंतर बीसीसीआयने दोन्ही दिग्गजांच्या भविष्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी 6 डिसेंबरनंतर विशेष बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत रोहित आणि विराटला देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय सहभागाचे निर्देश देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोहलीच्या भविष्यातील योजनांबाबत एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.
विजय हजारे ट्रॉफीत कोहलीची एन्ट्री?
बीसीसीआयला विराट आणि रोहित या दोघांनीही 2025–26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये भाग घ्यावा, अशी अपेक्षा आहे. ताज्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची मालिका संपल्यानंतर कोहली काही सामन्यांसाठी विजय हजारेत उतरू शकतो. ही स्पर्धा 24 डिसेंबर 2025 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान होणार असून, कोहली दिल्ली संघाकडून बेंगळुरूमध्ये होणाऱ्या निवडक सामन्यांसाठी उपलब्ध राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Rohit Sharma: "फिटनेस, कामगिरीसह भविष्यावर लक्ष द्या…" BCCI कडून रोहित शर्माला स्पष्ट आदेश
प्राप्त माहितीनुसार, एकदिवसीय मालिका संपताच कोहली लंडनला रवाना होईल. परंतु दिल्ली संघात सामील होण्यासाठी तो लवकरच भारतात पुनरागमन करणार आहे. मात्र, डीडीसीएला अद्याप अधिकृत कळविण्यात आलेले नाही. 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होत असल्याने कोहली संपूर्ण स्पर्धेत खेळणे शक्य नसल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा – Smriti-Palash Wedding:स्मृती आणि पलाशचं लग्न लवकरच? पलाशच्या आईने दिली महत्त्वाची माहिती
16 वर्षांनंतर पुन्हा विजय हजारे?
कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यानच आपल्या वर्षअखेरीच्या क्रिकेटिंग योजनेवर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची संभाव्य उपस्थिती क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. विजय हजारे ट्रॉफीत कोहलीची निवड झाली, तर हा क्षण चाहते विशेष मानतील कारण कोहलीने हा स्पर्धेतील शेवटचा सामना 2010 मध्ये, म्हणजे तब्बल 16 वर्षांपूर्वी खेळला होता. 2008 ते 2010 या कालावधीत दिल्लीकडून 13 विजय हजारे सामन्यांत तो उतरला होता. यात त्याने तब्बल 819 धावा, चार शतके नोंदवली होती.