Japan Emergency: जगात आधीच युद्धाचे ढग दाटलेले असताना आता उत्तर कोरियाने केलेल्या एका धाडसी कारवाईने जागतिक शांततेचा भंग केला आहे. हुकूमशाह किम जोंग उन यांच्या आदेशानुसार उत्तर कोरियाने एकामागून एक अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missiles) डागल्याने पूर्व आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यानंतर जपानने तातडीने देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली असून यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
नेमकी परिस्थिती काय?
इराण आणि अमेरिकेतील संघर्ष शांत होतो न होतो, तोच उत्तर कोरियाने ही लष्करी आगळीक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या सिन्पो क्षेत्रातील समुद्राच्या दिशेने कमी पल्ल्याच्या अनेक क्षेपणास्त्रांचा मारा केला. संयुक्त राष्ट्रांनी (UN) अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत इशारा देऊनही उत्तर कोरियाने हे पाऊल उचलल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे.
जपान आणि दक्षिण कोरिया हाय अलर्टवर
उत्तर कोरियाच्या या मिसाईल चाचणीनंतर शेजारील राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण आहे जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने या घटनेला दुजोरा देतानाच देशात इमर्जन्सी जाहीर केली आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दक्षिण कोरियाच्या संयुक्त चिफ ऑफ स्टाफने स्पष्ट केले की, उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे सुमारे 140 किलोमीटर अंतरापर्यंत झेपावली. दक्षिण कोरियाने जपान आणि अमेरिकेसोबत तातडीने माहितीची देवाणघेवाण सुरू केली असून, "कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत," असा इशाराही दिला आहे.
इराणकडूनही होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद
एकीकडे उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागली असतानाच, दुसरीकडे पश्चिम आशियातूनही चिंतेची बातमी आली आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा एकदा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत अमेरिका इराणच्या जहाजांवरील निर्बंध हटवत नाही, तोपर्यंत हा महत्त्वाचा जलमार्ग बंदच राहील, असा पवित्रा इराणने घेतला आहे. एकाच वेळी दोन मोठ्या जागतिक कोनांतून निर्माण झालेल्या या संघर्षांमुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जगाचे लक्ष अमेरिकेच्या भूमिकेकडे
उत्तर कोरियाच्या या उघड आव्हानानंतर आता संयुक्त राष्ट्र आणि अमेरिका कोणती कठोर पावले उचलणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत, मात्र किम जोंग उन यांनी त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केले आहे.