MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने सुमारे 2500 घरांच्या महासोडतीची संपूर्ण तयारी पूर्ण केली असून, येत्या 31 मार्च (मंगळवार) रोजी याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, जाहिरात प्रसिद्ध होताच त्याच दिवसापासून अर्ज नोंदणी आणि स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात करण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांना हक्काच्या घराची भेट मिळण्याची चिन्हे आहेत.
घरांचे दर 32 लाखांपासून 8 कोटींपर्यंत
2024 नंतर निघणारी ही सोडत मध्यमवर्गीयांसाठी प्रतिक्षित असली, तरी घरांच्या वाढलेल्या किंमतींनी अनेकांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. या लॉटरीत घरांचे दर 32 लाख रुपयांपासून थेट 8 कोटी रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी (EWS & LIG) यंदा घरांची संख्या तुलनेने कमी असल्याने, ही लॉटरी 'श्रीमंतांसाठी' अधिक आहे की काय, अशी चर्चा गृहनिर्माण वर्तुळात रंगू लागली आहे. वाढत्या बांधकाम खर्चामुळे म्हाडाच्या घरांच्या किमतीही आता खासगी विकासकांच्या तोडीस तोड वाटू लागल्या आहेत.
प्रमुख ठिकाणे आणि घरांचे अंदाजित दर
यंदाच्या सोडतीत मुंबईतील विविध भागांतील घरांचा समावेश आहे. यामध्ये पहाडी गोरेगाव येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वात स्वस्त घर 32 लाख रुपयांना उपलब्ध असेल. विक्रोळी (कन्नमवार नगर) मध्ये सर्वाधिक 1221 घरे असून त्यांची अंदाजित किंमत 80 लाख रुपये आहे. बोरिवली आणि पंतनगर येथे मध्यम गटातील घरे 1.07 कोटी ते 1.92 कोटी रुपयांच्या दरम्यान आहेत. पवई आणि तुंगा येथील प्रीमियम घरांची किंमत 1.35 कोटी ते 1.98 कोटी रुपये आहे. तर जुहू येथे मध्यम गटातील एक घर 4.84 कोटी रुपयांना उपलब्ध असेल.
ताडदेवमध्ये सर्वात महागडे घर; वांद्रे घरांचेही पुनरागमन
यंदाच्या सोडतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ताडदेव (क्रिसेंट टॉवर) येथील अति-उच्च गटातील दोन घरे, ज्यांची किंमत तब्बल 8 कोटी रुपये असून ती म्हाडाच्या इतिहासातील सर्वात महागडी घरे ठरली आहेत. यापूर्वी ही घरे विक्रीविना राहिली होती, जी आता पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या सोडतीत वांद्रे येथील घरांचाही समावेश करण्यात आला आहे, जे पश्चिम उपनगरात राहू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
हेही वाचा – Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरील उड्डाणांमध्ये होणार वाढ, 30 नव्या ठिकाणांसाठी विमानसेवा सुरू
अर्जदारांसाठी महत्त्वाची सूचना
येत्या 31 मार्च रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्जाची प्रक्रिया सुरू होईल. घरांच्या अंतिम किंमती आणि नियमावली जाहिरातीमध्ये स्पष्ट केली जाईल. इच्छुकांनी आपली कागदपत्रे आणि उत्पन्न दाखले तयार ठेवण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.