मुंबई: मुंबईत अनेक वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होते. मुंबई आणि ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न सुरू असतात. आता ठाणे-बोरिवली ट्विन टनेल हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठीच्या निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. एमएमआरडीएने हाती घेतलेल्या या नागरी परिवहन योजनेमुळे ठाणे ते बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या प्रवासासाठी गाडीने दीडे ते दोन तास लागतात. परंतु, बोगदा पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार करता येणार आहे.
ठाणे शहराला मुंबईतील पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी ठाणे-बोरिवली हा दुहेरी बोगदा महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आर्थिक मंजुरी दिली आहे. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह या दोन्ही प्रकल्पांसाठी 300 कोटींचा निधी एमएमआरडीएला मिळाला आहे. यातील 210 कोटी रुपये हे दुहेरी बोगद्यासाठी असतील, तर उर्वरित मरीन ड्राइव्ह प्रकल्पसाठी 90 कोटी रुपये असतील.
कसा असेल मार्ग?
सध्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाची निर्मिती केली जात आहे. हा भुयारी रस्ता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार असून त्याची एकूण लांबी 11.85 किलोमीटर असेल. भुयारी बोगद्याद्वारे यातील 10.25 किमीचे अंतर पार करण्यात येईल. भुयारी मार्गात दोन मुख्य मार्गिका असतील. परंतु, आपत्कालिन परिस्थितीसाठी एक स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात येईल. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल आणि आपत्कालिन परिस्थितीत तातडीची मदत मिळेल. या प्रकल्पासाठी तब्बल 18 हजार 838 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून नागरी परिवहनसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास करणाऱ्यांना घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुद्धा या वाहतुकीचा ताण जाणवतो. ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा सुरू झाल्यानंतर या दोन्ही महामार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाची बचत देखील होणार आहे. अनेक वर्षांपासून निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या प्रकल्पाच्या कामाला वेग येणार असून ठाणे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.