Tejas Thackeray New Plant Discovery : ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रियपणे कार्यरत असताना, तेजस ठाकरे यांनी मात्र नेहमीच या राजकीय प्रवासापासून स्वतःला दूर ठेवले आहे. वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष रुची असलेल्या तेजस यांनी पुन्हा एकदा निसर्ग क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. तेजस ठाकरे आणि त्यांच्या ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन’च्या (Thackeray Wildlife Foundation) टीमने अरुणाचल प्रदेशातील सुबानसिरी खोऱ्यातील अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलात संशोधन करून वनस्पतीची एक नवीन आणि अत्यंत दुर्मीळ प्रजाती शोधून काढली आहे. पूर्व हिमालयीन जैवविविधता हॉटस्पॉट क्षेत्रात नोंदवली गेलेली ही अशा प्रकारची केवळ दुसरी प्रजाती ठरली आहे.
आईच्या सन्मानार्थ 'मिट्रेफोरा रश्मिया' नामकरण
या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतीचा शोध लागल्यानंतर तेजस ठाकरे यांनी या वनस्पतीचे नामकरण आपल्या मातोश्री रश्मी ठाकरे यांच्या सन्मानार्थ ‘मिट्रेफोरा रश्मिया’ (Mitrephora rashmiae) असे केले आहे. रश्मी ठाकरे यांनी तेजस यांच्यातील बालपणीची निसर्गाविषयीची उत्सुकता आणि वर्गीकरण शास्त्राची (Taxonomy) आवड जोपासण्यासाठी नेहमीच मोठे प्रोत्साहन दिले. तसेच, ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या स्थापनेत आणि त्याच्या वाढीमध्ये रश्मी ठाकरे यांनी दिलेल्या बहुमूल्य पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही विशेष प्रजाती त्यांना समर्पित करण्यात आली आहे.
सीताफळ कुळातील वनस्पतीची आगळीवेगळी वैशिष्ट्ये
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन प्रजाती अत्यंत आकर्षक फुले येणाऱ्या ‘कस्टर्ड ॲपल’ म्हणजेच आपल्या पारंपरिक सीताफळ (Annonaceae) कुळातील ‘मिट्रेफोरा’ (Mitrephora) या वर्गातील आहे. ही वनस्पती तिच्या फुलांच्या वेगळ्या रचनेसाठी ओळखली जाते. सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे, एकाच झाडावर नर (Male) आणि उभयलिंगी (Bisexual) अशी दोन्ही प्रकारची फुले येणारी ही या संपूर्ण वर्गातील एकमेव प्रजाती असल्यामुळे ती वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जात आहे.
अस्तित्वात आहे अवघी एक वनस्पती; संरक्षणाची गरज
या वनस्पतीचा शोध लागला असला तरी पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, कारण सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार या अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे जंगलात अवघे 1 चे झाड अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे. तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक नवीन आणि दुर्मीळ प्रजाती शोधून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. आता लागलेल्या या नव्या शोधामुळे पूर्व हिमालयातील समृद्ध वनसंपदा आणि जैवविविधतेवर पुन्हा एकदा प्रकाश पडला असून, या एकमेव झाडाचे आणि अशा वनस्पतींचे जतन करण्याचे मोठे आव्हान शास्त्रज्ञांसमोर असणार आहे.