Shakira Mumbai Concert: जागतिक पॉप स्टार शकीरा तब्बल 19 वर्षांनंतर भारतात परतत असून, तिच्या आगामी दौऱ्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. शकीराच्या कॉन्सर्टची घोषणा झाल्यापासून तिकिटांसाठी झुंबड उडाली असून, किमती 35,000 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. चाहत्यांचा हा तुफान प्रतिसाद पाहून शकीराने आपल्या भारतीय चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर आता नियोजित शो व्यतिरिक्त आणखी एक अतिरिक्त कॉन्सर्ट होणार आहे.
मुंबईत सलग दोन दिवस 'हिप्स डोन्ट लाय'चा जलवा
आधीच्या वेळापत्रकानुसार, शकीराचा पहिला शो 10 एप्रिल रोजी मुंबईत होणार होता. मात्र, वाढती मागणी लक्षात घेता आता 11 एप्रिल रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथेच दुसरा शो आयोजित करण्यात आला आहे. मुंबईतील दोन धडाकेबाज सादरीकरणानंतर शकीरा 15 एप्रिल रोजी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आपला तिसरा शो सादर करेल. अशा प्रकारे या दौऱ्यात शकीरा भारतात एकूण 3 मोठे कॉन्सर्ट करणार आहे.
तिकीट बुकिंग आणि दरांची स्थिती
शकीराच्या अतिरिक्त शोची माहिती 'झोमॅटो'च्या डिस्ट्रिक्ट (District) अॅपवर नवीन लिस्टिंग दिसल्यानंतर समोर आली. 11 एप्रिलच्या या शोसाठी तिकीट विक्री अद्याप सुरू झालेली नाही, परंतु लवकरच बुकिंगची तारीख जाहीर केली जाणार आहे. तिकीट दरांबाबत बोलायचे झाले तर, मुंबईतील शोसाठी सामान्य प्रवेशाची (General Admission) सुरुवात 6,000 रुपयांपासून होत आहे, तर प्रीमियम पॅकेजची किंमत 32,000 रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी काळ्या बाजारात किंवा रिसेलमध्ये ही किंमत 35,000 रुपयांवर गेली आहे.
भारतीय चाहत्यांची 19 वर्षांची प्रतीक्षा संपली
जवळपास दोन दशकांनंतर शकीरा भारतात येत असल्याने संगीत प्रेमींमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. आयोजकांच्या मते, पहिल्या शोची सर्व तिकिटे काही वेळातच संपल्यामुळे दुसरा शो जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई आणि दिल्लीतील या तिन्ही कार्यक्रमांमुळे भारतात एप्रिल महिन्यात 'पॉप' संगीताची मोठी लाट येणार असल्याचे चित्र दिसत आहे.