Viral Video: राजधानी मुंबईत मिठाई शौकिनांच्या सुरक्षेशी खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नागरिकाने नामांकित दुकानातून खरेदी केलेल्या काजू कतलीमध्ये चक्क धातूची गंजलेली पिन आढळून आली आहे. संबंधित ग्राहकाने आपल्या 3 वर्षांच्या चिमुकलीला ही मिठाई भरवण्यापूर्वीच ही पिन दृष्टीस पडल्याने एक मोठा अनर्थ टळला. या निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अन्न सुरक्षेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्राहकाचा आरोप आणि सुदैवाने टळलेला अनर्थ
प्रणय पालाव नावाच्या ग्राहकाने या घटनेबाबत इन्स्टाग्रामवर सविस्तर माहिती आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जुलैच्या संध्याकाळी त्यांनी ‘तिवारी ब्रदर्स’ या दुकानातून प्रत्येकी 500 ग्रॅम काजू कतली आणि मोतीचूर लाडू खरेदी केले होते. आपल्या 3 वर्षांच्या मुलीला काजू कतली देणार तितक्यातच त्या तुकड्यात काहीतरी रुतल्याचे त्यांच्या लक्षात आले. बारकाईने पाहिले असता, ती एक गंजलेली स्टेपलर किंवा धातूची पिन असल्याचे स्पष्ट झाले. नशीब बलवत्तर म्हणून ही पिन आधीच दिसली, अन्यथा चिमुकलीच्या जिवावर बेतले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुकानाच्या कर्मचाऱ्यांना जाब अन् किचनमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य
घटनेनंतर प्रणय यांनी थेट मिठाईच्या दुकानात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. या संभाषणाचा आणि दुकानाच्या स्वयंपाकघराचा व्हिडिओ त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये दुकानातील किचनची दयनीय अवस्था आणि अस्वच्छता स्पष्टपणे दिसत आहे. एवढेच नव्हे तर स्वयंपाकघराच्या आतच स्वच्छतागृह असल्याचेही या व्हिडिओद्वारे उघडकीस आले आहे. उच्च दराने मिठाई विकणाऱ्या ब्रँडच्या अशा निष्काळजीपणावर त्यांनी जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नेटकऱ्यांचा तीव्र संताप आणि प्रतिक्रिया
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “अशा प्रकारच्या अस्वच्छतेमुळे आणि निष्काळजीपणामुळे बाहेरून मिठाई खरेदी करण्यापेक्षा घरीच बनवणे अधिक सुरक्षित वाटते,” अशी टिप्पणी एका युजरने केली. तर दुसऱ्या युजरने “इतके महागडे पदार्थ विकणाऱ्या ‘तिवारीज’सारख्या प्रसिद्ध दुकानाकडून अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाची अपेक्षा नव्हती,” असे म्हणत अन्न सुरक्षा विभागाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे.