Mumbai Central Digital Lounge: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन प्रवाशांना आता केवळ प्रवासाचा अनुभव देणार नाही, तर कामासाठीसुद्धा एक आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त जागा उपलब्ध करून देणार आहे. पश्चिम रेल्वेने उभारत असलेल्या अत्याधुनिक ‘डिजिटल लाउंज’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरच्या मध्यापासून ते सार्वजनिक वापरासाठी खुले होण्याची शक्यता आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे लाउंज उभारले जात असल्याने याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे 2.71 कोटी रुपये खर्च आणि 1,712 चौरस फूट क्षेत्रफळ असलेले लाउंज मुंबई सेंट्रल येथे उभे राहत आहे. प्रवाशांना ट्रेनची प्रतीक्षा करताना काम करता यावे, ऑनलाईन मीटिंग घेता यावी किंवा विद्यार्थ्यांना शांत अभ्यासाची जागा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सध्या स्टेशनवर साधे प्रतीक्षालय आणि शुल्क आकारले जाणारे एक्झिक्युटिव्ह लाउंज उपलब्ध असले तरी ते कामकाजासाठी सोयीचे नसते.
दरम्यान, नवीन डिजिटल लाउंजमध्ये मात्र हाय-स्पीड वायफाय, आरामदायक खुर्च्या-टेबल, मोफत वीज, अनेक चार्जिंग पॉइंट्स, तसेच कॅफे सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे ट्रेन येण्याआधी काम करण्यासाठी हॉटेल किंवा कॅफेमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ही सुविधा सुरू झाल्यानंतर व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी स्टेशनवरील वेळ अधिक उपयोगी आणि सोयीचा ठरेल.
तथापी, रेल्वे प्रशासनाने या लाउंजमधून दरवर्षी सुमारे 50 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे लाउंज फक्त प्रवाशांसाठीच नव्हे तर मुंबईत काम करणारे फ्रीलान्सर, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी आणि शांत वातावरण शोधणाऱ्या नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. कॅफे आणि खाद्यदुकानांच्या सोयींसह, ही जागा काम आणि विश्रांतीचा उत्तम समन्वय साधणारी ठरेल. या प्रकल्पामुळे रेल्वे स्टेशन ही केवळ प्रवासाची जागा न राहता, एक आधुनिक को-वर्किंग हब म्हणूनही उदयास येणार आहे.