Mumbai Local Mega Block: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी या आठवड्याचा शेवट प्रवासाच्या दृष्टीने कसरतीचा ठरणार आहे. पश्चिम रेल्वेवर 6 व्या मार्गिकेच्या कामासाठी तर मध्य रेल्वेवर नियमित देखभालीसाठी मोठे ब्लॉक घेण्यात आले आहेत. यामुळे शेकडो लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या 254 फेऱ्या रद्द, एक्स्प्रेसच्या वेळांतही बदल
कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6 व्या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी 10 आणि 11 जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. 10 जानेवारीला 101 आणि 11 जानेवारीला 153 अशा एकूण 254 लोकल फेऱ्या रद्द राहतील. यात एसी आणि 15 डब्यांच्या लोकलचाही समावेश आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर टप्प्याटप्प्याने काम चालणार आहे.
गाड्यांच्या प्रवासात कपात –
नंदूरबार-बोरिवली आणि अहमदाबाद-बोरिवली या गाड्या वसई रोडपर्यंतच चालवल्या जातील. तसेच वांद्रे-गोरखपूर आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद या एक्स्प्रेस गाड्या काही काळ उशिराने सुटतील. तथापी, रविवारी मेगाब्लॉकचा फटका मध्य रेल्वेवरील प्रवाशांनाही बसणार आहे. रविवारी (11 जानेवारी) रुळ आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक जाहीर केला आहे.
हेही वाचा – CSMT Station: मुंबईकरांनो लक्ष द्या! आता CSMT वरून ट्रेन पकडायची असेल तर आधी करावं लागणार ‘हे’ काम
मुख्य मार्ग (CSMT ते विद्याविहार): सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येतील. परिणामी काही गाड्या रद्द होतील, तर काही 20 मिनिटे उशिराने धावतील.
ट्रान्स हार्बर (ठाणे ते वाशी/नेरूळ): सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था पाहावी लागेल.
हार्बर मार्ग: सुदैवाने सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नाही, मात्र गाड्या विलंबाने धावण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : 'बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही…'; भाजपच्या 'या' नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत 'Yatri App' किंवा वेळापत्रक तपासा. शक्य असल्यास पर्यायी बस सेवा किंवा मेट्रोचा वापर करा. तथापी, ब्लॉक दरम्यान रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन बदला.