Mumbai News: मुंबई रेल्वे यार्डात भयंकर दृश्य; अमृतसर एक्सप्रेसच्या डब्याखाली आढळला तुटलेला पाय, बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू

रेल्वे प्रवाशांना उतरवून यार्डात गेल्यानंतर, जेव्हा स्वच्छता आणि देखभालीचे काम सुरू झाले, तेव्हा हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला.

Mumbai News: मुंबई रेल्वे यार्डात भयंकर दृश्य; अमृतसर एक्सप्रेसच्या डब्याखाली आढळला तुटलेला पाय, बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू

Mumbai News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसर एका अत्यंत धक्कादायक घटनेने हादरला आहे. पंजाबमधील अमृतसर येथून मुंबईत दाखल झालेल्या एका वेगवान रेल्वेच्या डब्याखाली मानवी शरीराचा एक तुटलेला भाग आढळून आला आहे. रेल्वे प्रवाशांना उतरवून यार्डात गेल्यानंतर, जेव्हा स्वच्छता आणि देखभालीचे काम सुरू झाले, तेव्हा हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे स्थानक आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत.

स्वच्छता मोहिमेदरम्यान 'M-2' कोचखाली थरार
अमृतसरवरून आलेली ही एक्स्प्रेस मुंबईत पोहोचल्यानंतर नेहमीप्रमाणे देखभालीसाठी यार्डात नेण्यात आली होती. तेथे कामगार रेल्वेची स्वच्छता करत असताना, त्यांना 'M-2' या डब्याच्या खाली गुडघ्यापासून तुटलेला एका पुरुषाचा पाय अडकलेल्या स्थितीत दिसला. हा भयंकर दृश्य पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून तो मानवी अवयव पुढील वैद्यकीय चाचण्यांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात रवाना केला आहे.

प्रवासादरम्यान अपघाताची नोंद नाही; रेल्वे प्रशासनाचा खुलासा
या खळबळजनक प्रकरणावर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अमृतसर ते मुंबई या संपूर्ण प्रवासादरम्यान रेल्वेच्या अधिकृत दप्तरी कुठेही अपघात झाल्याची किंवा साखळी ओढली गेल्याची नोंद झालेली नाही. रेल्वे पोलीस आता या एक्स्प्रेसच्या मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे विभागांशी आणि स्थानकांशी संपर्क साधत आहेत. गेल्या 24 तासांत रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या अपघातांची आणि बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.

हेही वाचा – Mumbai Local News : धक्कादायक! लोकलमध्ये एक व्यक्ती नशा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

रुळ ओलांडताना घातपात झाल्याची प्राथमिक शक्यता
रेल्वेच्या सुरक्षा तज्ज्ञांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, एखाद्या व्यक्तीने धावती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला असावा किंवा रेल्वे रुळ ओलांडताना तिचा अपघात झाला असावा. त्या अपघातात हा पाय डब्याच्या खालच्या भागात अडकून तसाच मुंबईपर्यंत ओढत आला असण्याची शक्यता आहे. मात्र, हा अपघात नेमका कोणत्या राज्यात आणि कोणत्या स्टेशनदरम्यान झाला, तसेच ती व्यक्ती जिवंत आहे की नाही, याबद्दल अद्याप कोणतेही ठोस तपशील समोर आलेले नाहीत. जीआरपी (GRP) या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number