Bus Stand Accident : गर्दीची वेळ, प्रवाशांची वरदळ…इतक्यात बसस्थानकातील फलाटाच्या दिशेने वेगाने आली बस; नियंत्रण सुटले आणि बस प्रवाशांच्या अंगावरून…

हावेरीहून लक्ष्मेश्वरच्या दिशेने जाणारी एक 'नॉन-स्टॉप' बस अत्यंत वेगाने स्थानकात शिरली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट प्रवाशांच्या अंगावर आली.

Bus Stand Accident : गर्दीची वेळ, प्रवाशांची वरदळ…इतक्यात बसस्थानकातील फलाटाच्या दिशेने वेगाने आली बस; नियंत्रण सुटले आणि बस प्रवाशांच्या अंगावरून…

Bus Stand Accident: कर्नाटकातील हावेरी मध्यवर्ती बसस्थानकावर बुधवारी सकाळी एका भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या प्लॅटफॉर्मवर एक भरधाव परिवहन बस थेट घुसली आणि तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांना चिरडले. या थरारक अपघातात एका 2 वर्षांच्या चिमुकल्यासह एकूण 4 जण गंभीर जखमी झाले असून, ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

प्रवासी बसची वाट पाहत असतानाच काळाचा घाला
हा अपघात सकाळी 7:00 च्या सुमारास घडला, जेव्हा अनेक प्रवासी आपल्या नियोजित प्रवासासाठी प्लॅटफॉर्मवर उभे राहून बसची वाट पाहत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हावेरीहून लक्ष्मेश्वरच्या दिशेने जाणारी एक 'नॉन-स्टॉप' बस अत्यंत वेगाने स्थानकात शिरली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट प्रवाशांच्या अंगावर आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची पळापळ झाली, मात्र काही जण बसखाली सापडले.

2 वर्षांच्या बालकाची प्रकृती चिंताजनक; हुबळीला हलवले
या अपघातातील जखमींमध्ये सवनूर येथील हजरत अली या 2 वर्षांच्या बालकाचा समावेश असून, त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्याला तातडीने हुबळी येथील 'KIMS' रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय बांकापूर येथील वासुदेव (वय 44), हर्षा (वय 6) आणि काव्यांजली (वय 39) हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर बसस्थानकावर गोंधळ आणि संताप
अपघातानंतर बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. या घटनेमुळे पीडितांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी चालकाने इतक्या वेगाने बस का आणली? असा सवाल उपस्थित करत स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

हेही वाचा – PM Modi Assam Visit: पंतप्रधान पोहोचले चहाच्या मळ्यात ; महिला कामगारांसोबत साधला संवाद, पानं खुडतानाचे फोटो व्हायरल

चालक पसार; पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
अपघात घडल्यानंतर बसचा चालक प्रवाशांच्या रोषाला घाबरून घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी हावेरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. हा अपघात मानवी चुकीमुळे घडला की बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा तपास तांत्रिक तज्ज्ञांच्या मदतीने केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number