Mumbai Gas Shortage: सध्या सुरू असलेल्या आखाती युद्धाचे भीषण परिणाम आता केवळ जागतिक राजकारणापुरते मर्यादित न राहता मुंबईकरांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या एलपीजी (LPG) गॅसच्या तीव्र टंचाईमुळे मुंबईतील गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. गॅस सिलिंडर मिळणे कठीण झाल्याने आणि वाढत्या किमतींमुळे आता मुंबईसारख्या प्रगत महानगरातही ग्रामीण भागातील पारंपरिक चुलींचा वापर वाढू लागला आहे. उपनगरांमध्ये आणि चाळींमध्ये नागरिक आता स्वयंपाकासाठी पुन्हा एकदा मातीच्या चुलींचा आधार घेताना दिसत आहेत.
धारावीच्या कुंभारवाड्यात चुलींची मागणी वाढली
मुंबईचे हृदय मानल्या जाणाऱ्या धारावीतील प्रसिद्ध ‘कुंभारवाडा’ सध्या या बदलाचे केंद्र ठरला आहे. युद्धाच्या परिणामांमुळे गॅसची टंचाई निर्माण झाल्याने कुंभारवाड्यात मातीच्या चुली बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ घरगुती वापरासाठीच नव्हे, तर छोटे हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ चालवणाऱ्यांकडूनही या चुलींना मोठी मागणी येत आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प होऊ नये, यासाठी व्यावसायिक पारंपरिक चुलींकडे वळले आहेत. धारावीच्या बाजारपेठेत सध्या ठिकठिकाणी मातीच्या चुली विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.
शहरी भागात ग्रामीण संस्कृतीची एन्ट्री; काय सांगतात व्यावसायिक?
“गॅस मिळत नाहीये आणि मिळाला तरी तो परवडण्यापलीकडे गेला आहे, त्यामुळे ग्राहक आता चुलींना प्राधान्य देत आहेत,” असे कुंभारवाड्यातील कारागिरांनी सांगितले. विशेष म्हणजे, ज्या मुंबईत धूरमुक्त स्वयंपाकघराचे स्वप्न पाहिले जात होते, तिथेच आता धुराच्या चुली पेटू लागल्या आहेत. अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी पर्यायी व्यवस्था म्हणून या चुली विकत घेण्यास सुरुवात केली आहे. गॅसच्या या अनिश्चिततेमुळे ग्रामीण भागातील ही संस्कृती आता मुंबईच्या गल्लीबोळात पुन्हा एकदा पाहायला मिळत असून, युद्ध थांबल्याशिवाय ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नसल्याचे बोलले जात आहे.