Dadar Gas Pipeline Leak: मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या दादर (पश्चिम) येथील गोखले रोडवर आज संध्याकाळी एका खोदकामादरम्यान महानगर गॅसची मुख्य पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. गॅस वाहिनीला भगदाड पडल्यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात गॅस गळती (Gas Leakage) झाली. संभाव्य धोका आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलत शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च दरम्यानचा संपूर्ण रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाचा बुंधा जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने उपटण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हवेत उडाले गॅसचे कारंजे; संपूर्ण परिसर केला निर्मनुष्य
ही दुर्घटना संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली असून, गेल्या पाऊण तासांपासून येथे सातत्याने गळती सुरू आहे. गॅस वाहिनी फुटल्यानंतर पाण्याचे फवारे उडावेत त्या वेगाने हवेत गॅसचे मोठे कारंजे उडाले. ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा आणि निवासी इमारतींनी वेढलेला असल्याने पोलिसांनी तातडीने गोखले रोडवरील नागरिकांची ये-जा थांबवली असून, संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
या गंभीर परिस्थितीवर स्थानिक मनसे नेते व माजी नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी घटनास्थळावरून प्रशासकीय कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले, “अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणा वेळेवर पोहोचली असून त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. महानगर गॅसच्या तांत्रिक पथकाला पोहोचण्यास थोडा उशीर झाला, परंतु ते पोहोचताच मुख्य लाईनचा पुरवठा बंद केला जाईल. संपूर्ण परिसरात गॅसचा तीव्र वास पसरला असला, तरी आजूबाजूच्या रहिवाशांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. प्रशासन योग्य ती सर्व खबरदारी घेत आहे.” दादरसारख्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्यामुळे गॅस पुरवठा खंडित करून ही गळती लवकरात लवकर रोखणे हे सध्या यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.