Anil Ambani Reliance Communications : प्रख्यात उद्योगपती आणि रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. 1085 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेने केलेल्या तक्रारीनंतर ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे कॉर्पोरेट जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) मुख्य व्यवस्थापक संतोषकृष्ण अण्णावरपू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2013 ते 2017 या कालावधीत अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बँकेची मोठी फसवणूक केली. या प्रकरणात केवळ PNB नव्हे, तर युनायटेड बँक ऑफ इंडियाचीही फसवणूक झाली आहे. बँकांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण नुकसानीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
– पंजाब नॅशनल बँक: 621.39 कोटी रुपये.
– युनायटेड बँक ऑफ इंडिया: 463.80 कोटी रुपये (या बँकेचे 2020 मध्ये PNB मध्ये विलीनीकरण झाले आहे).
निधीचा गैरवापर आणि गुन्हेगारी कट
बँकेने आपल्या तक्रारीत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्सने कर्ज परत न करण्याच्या उद्देशानेच 1085 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा बँकांनी केला आहे. ज्या विशिष्ट कामासाठी कर्ज मंजूर करण्यात आले होते, त्याऐवजी हा निधी जाणीवपूर्वक इतरत्र वळवण्यात आला. आरोपींनी संगनमताने बँकेच्या पैशांचा गैरवापर करून केवळ फसवणूकच केली नाही, तर 'गुन्हेगारी विश्वासघात' केल्याचेही एफआयआरमध्ये (FIR) नमूद करण्यात आले आहे.
कर्ज खाती 'थकीत' आणि पुढील कारवाई
कंपनीने आर्थिक शिस्तीचे पालन न केल्यामुळे आणि कर्जाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे 2017 मध्ये ही कर्ज खाती 'थकीत कर्ज' (NPA) म्हणून घोषित करण्यात आली होती. सीबीआयने दाखल केलेल्या या गुन्ह्यामध्ये अनिल अंबानी यांच्यासह मंजरी अशोक काकर आणि रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे आता अनिल अंबानी यांच्या मालमत्तेवर आणि व्यवसायावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – Most Powerful Women in India: भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर; कोण आहे अव्वल स्थानी? वाचा