Mumbai Ferry Boat: मुंबई आणि लगतच्या समुद्र किनाऱ्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर आणि सुटसुटीत होणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (MMB) एका खासगी पोर्टलशी तिकीट बुकिंगसाठी करार केला असून, लवकरच प्रवाशांना फेरी बोटींची तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार आहेत. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांपासून मुक्ती मिळणार आहे.
प्रमुख मार्गांवर सेवा उपलब्ध होणार
सुरुवातीच्या टप्प्यात ही ऑनलाईन तिकीट सेवा मुंबईतील महत्त्वाच्या जलमार्गांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, एलिफंटा लेणी, तसेच वर्सोवा ते मढ या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते, त्यामुळे ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्याने प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. ही सुविधा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, राज्यातील सर्वच फेरी बोटींची तिकिटे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे बोर्डाचे नियोजन आहे.
हेही वाचा – Dust Storm: मुंबईकरांनो घरातच राहा! ठाणे, नवी मुंबईत धुळीच्या वादळाचा हाहाकार; पाहा धडकी भरवणारे व्हिडीओ
नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश
फेरी बोटींच्या तिकीट वितरणात सुसूत्रता यावी आणि प्रवाशांना डिजिटल सुविधा मिळाव्यात, यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. त्यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळेच ही ऑनलाईन तिकीट प्रणाली प्रत्यक्षात येत आहे. या करारामुळे जलवाहतूक क्षेत्रातील डिजिटलायझेशनला चालना मिळणार असून, पर्यटकांनाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.