ट्रक चोरीला गेला, डोक्यावर 21 लाखांचं कर्ज.. पोलिसांचा तपास कुचकामी; घरच्या कमावत्या तरुणाने जीवन संपवलं

संदेश हा टँकर चालवून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत होता. त्याने व्यवसायासाठी 21 लाख रुपयांचे कर्ज काढून एक ट्रक खरेदी केला होता. मात्र, सुमारे 1.5 वर्षांपूर्वी हा ट्रक चोरीला गेला.

ट्रक चोरीला गेला, डोक्यावर 21 लाखांचं कर्ज.. पोलिसांचा तपास कुचकामी; घरच्या कमावत्या तरुणाने जीवन संपवलं

Chhatrapati Sambhajinagar Sandesh Gawli Suicide Case : छत्रपती संभाजीनगर शहरातील जय भवानीनगर परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका 26 वर्षीय तरुणाने चोरीला गेलेला ट्रक न सापडल्याच्या नैराश्यातून आणि ट्रकसाठी घेतलेल्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून आत्महत्या केली आहे. संदेश दिनकर गवळी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, त्याने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करणारी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. विशेष म्हणजे, आयुष्य संपवण्यापूर्वी त्याने हसतमुखाने एक सेल्फी काढला आणि तो आपल्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर पाठवला, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

21 लाखांचे कर्ज आणि पोलिसांचे अपयश
संदेश हा टँकर व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करत होता. त्याने व्यवसायासाठी 21 लाख रुपयांचे कर्ज काढून एक ट्रक खरेदी केला होता. मात्र, सुमारे 1.5 वर्षांपूर्वी हा ट्रक चोरीला गेला. ट्रक चोरीला गेल्यापासून संदेशने पोलिसांकडे वारंवार धाव घेतली, मात्र पोलिसांना तो ट्रक शोधण्यात यश आले नाही. उत्पन्नाचे साधन असलेल्या ट्रकचा पत्ता नव्हता आणि दुसरीकडे बँकेच्या कर्जाचे हप्ते मात्र नियमित सुरूच होते. या दुहेरी संकटामुळे संदेश गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता.

हसऱ्या चेहऱ्याने अखेरचा निरोप
गुरुवारी सायंकाळी जेव्हा संदेशचे कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते, तेव्हा तो घरी एकटाच होता. त्याने प्रथम आपली व्यथा मांडणारी एक सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईलवरून एक हसतमुख सेल्फी काढला आणि तो आपल्या मित्रांच्या व्हॉट्सअॅपवर पाठवून दिला. जणू काही आपल्या मनातील वेदना कोणालाही कळू नयेत, अशा आविर्भावात त्याने हा फोटो पाठवला होता. फोटो पाठवल्यानंतर त्याने विष प्राशन केले. रात्री उशिरा कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना संदेश गंभीर अवस्थेत आढळला. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, पण मध्यरात्री उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Pune Crime: तरुणीला अश्लील मेसेज पाठवणं पडलं महागात; छेडछाड करणाऱ्या HR ला धु-धु धुतला, पाहा व्हिडीओ

"आईची काळजी घ्या…" काळीज चिरणारी सुसाईड नोट
संदेशने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याचे दुःख ओसंडून वाहत होते. "मला या कर्जाचा आता कंटाळा आला आहे. मी माझी जीवनयात्रा संपवत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये," असे त्याने नमूद केले होते. त्याने आपल्या पत्रात आईची माफी मागत लिहिले, "आई, तू दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करू शकलो नाही, मला माफ कर. माझ्या पश्चात आईची काळजी घ्या. तसेच माझ्या अंत्यविधीसाठी होणाऱ्या खर्चाबद्दलही मी माफी मागतो." या पत्रात त्याने पोलिसांच्या निष्क्रियतेवरही बोट ठेवले, कारण दीड वर्ष उलटूनही त्याचा चोरीला गेलेला ट्रक त्यांना शोधता आला नव्हता.

कुटुंबाचा जबाबदार आधार हरपला
गवळी कुटुंब जय भवानीनगरमध्ये राहते. संदेशच्या कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. तो आपल्या कुटुंबातील एक अत्यंत जबाबदार सदस्य होता आणि टँकर व्यवसायातून सर्वांना आर्थिक स्थैर्य देण्याचे स्वप्न तो पाहत होता. मात्र, एका चोरीच्या घटनेने आणि त्यानंतर प्रशासनाने दाखवलेल्या उदासीनतेने एका उमद्या तरुणाचा बळी घेतला आहे. संदेशच्या जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, गुन्हेगारांसोबतच यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावरही संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Pakistani Fairness Cream : मोठी कारवाई! गोरं होण्याच्या नावाखाली आयुष्याशी खेळ; बंदी असलेल्या 'पाकिस्तानी क्रीम्स'वर पोलिसांचा छापा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number