Tejaswini Pandit Post : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज रणधुमाळी सुरू असतानाच, मनोरंजन विश्वातून मनसे प्रमुख राज ठाकरेंना एक भावनिक आणि खंबीर पाठिंबा मिळाला आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर राज ठाकरेंसाठी एक खास कविता शेअर करत, या 'मोठ्या लढाईत' आपण त्यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे.

तेजस्विनीची 'ती' पोस्ट आणि कवितेच्या ओळी
आपली मते रोखठोक मांडणाऱ्या तेजस्विनीने इन्स्टाग्राम स्टोरीवर राज ठाकरेंचा उल्लेख करत मराठी मातीसाठी लढण्याचे आवाहन केले आहे. तिने लिहिले, 'मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या, मनगटाचं जोर लावून.. तू आभाळ आभाळ, वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ दावजी.' या ओळींमधून तिने राज ठाकरेंच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या मराठी अस्मितेच्या विचारांवर असलेला आपला अढळ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.
20 वर्षांनंतरची ऐतिहासिक युती आणि तेजस्विनीचा पाठिंबा
यावेळची निवडणूक विशेष आहे कारण तब्बल दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच बाजूने निवडणूक लढवत आहेत. या युतीचे स्वागत करताना तेजस्विनीने आधीही म्हटले होते की, तिचे राज ठाकरेंवरचे प्रेम नि:स्वार्थी आहे. 'लोक तुमच्या राजकारणाबद्दल काय म्हणतात, याच्याशी मला देणेघेणे नाही. तुमचा ध्यास आणि स्वप्ने महत्त्वाची आहेत आणि आमचा तुम्हाला बिनशर्त पाठिंबा आहे,' अशा भावना तिने व्यक्त केल्या होत्या.
दरम्यान, मुंबईत शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले आहे की, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. यंदा मुंबईच्या महापालिकेत भगवाच फडकणार आणि आमचाच मराठी माणूस महापौर होणार. तथापी, तेजस्विनी पंडितच्या या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.