C.D Gopinath Death: भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिल्या कसोटी विजयाचे साक्षीदार आणि त्या सुवर्णकाळातील हयात असलेले शेवटचे सदस्य, सी.डी. गोपीनाथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. गोपीनाथ हे भारताचे सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू होते. जागतिक स्तरावर ऑस्ट्रेलियाच्या नील हार्वे यांच्यानंतर ते दुसरे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते.
पदार्पणातच गाजवले मैदान
1 मार्च 1930 रोजी जन्मलेल्या गोपीनाथ यांनी भारत आणि मद्रास संघासाठी 8 कसोटी आणि 83 प्रथम-श्रेणी सामने खेळले. 1951 मध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध त्यांनी कसोटी पदार्पण केले. आपल्या पहिल्याच सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्यांनी नाबाद 50 आणि दुसऱ्या डावात 42 धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
ऐतिहासिक विजयाचे एकमेव साक्षीदार
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 1952 चा चेन्नई कसोटी विजय हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. भारताने इंग्लंडवर मिळवलेल्या या पहिल्यावहिल्या कसोटी विजयात गोपीनाथ यांनी 35 धावांचे योगदान दिले होते. एका मुलाखतीत त्यांनी या आठवणींना उजाळा दिला होता. "त्या ऐतिहासिक संघातील मी एकमेव जिवंत सदस्य आहे, हे ऐकून मला नवल वाटले होते," असे त्यांनी मिश्किलपणे नमूद केले होते. गोपीनाथ यांनी 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
कारकिर्दीचा आलेख
गोपीनाथ यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 12 डावांमध्ये 242 धावा केल्या. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 42.16 च्या सरासरीने 4259 धावा फटकावल्या आहेत. मैदानातील चपळ क्षेत्ररक्षण आणि संयमी फलंदाजीसाठी ते ओळखले जात असत. त्यांच्या निधनानंतर आता 95 वर्षीय चंद्रकांत पाटणकर हे भारतातील सर्वात वयस्कर हयात कसोटी क्रिकेटपटू ठरले आहेत.
क्रिकेट विश्वावर शोककळा
सी.डी. गोपीनाथ यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटमधील एका धगधगत्या पर्वाचा अंत झाला आहे. बीसीसीआय (BCCI) सह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेटची पायाभरणी करणाऱ्या पिढीतील एक महत्त्वाचा दुवा निखळल्याची भावना क्रीडाप्रेमींमधून व्यक्त होत आहे.