Wilson Point Mahabaleshwar : महाबळेश्वरच्या विल्सन पॉइंटवर पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप; वन विभागाकडून कडक नियमावली जाहीर

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सातारा वन विभागाने आता कडक पावले उचलली आहेत.

Wilson Point Mahabaleshwar : महाबळेश्वरच्या विल्सन पॉइंटवर पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप; वन विभागाकडून कडक नियमावली जाहीर

Wilson Point Mahabaleshwar Forest Rules : निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील प्रसिद्ध विल्सन पॉइंटवर दररोज देश-विदेशातील हजारो पर्यटक हजेरी लावतात. मात्र, या पर्यटन स्थळाच्या सभोवतालच्या गाभा वनक्षेत्रात (Core Forest Area) रात्रीच्या वेळी काही पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सातारा वन विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. मुख्य सनराईज पॉइंट वगळता सभोवतालच्या राखीव वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, भेकवली यांच्या वतीने देण्यात आला आहे.

सूर्यास्तानंतर मुख्य प्रवेशद्वार राहणार बंद
वनक्षेत्राची शांतता आणि सुरक्षेचा उपाय म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार आहे. हे प्रवेशद्वार आता थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल, त्यामुळे पर्यटकांनी संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच आपली वाहने आवाराबाहेर काढून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत वनक्षेत्रात लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

पाळीव प्राण्यांना नो-एन्ट्री आणि वन्यजीवांना खाद्य देण्यावर निर्बंध
वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी आणि संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात, ज्यामुळे वन्यजीवांच्या आरोग्यावर आणि सवयींवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे प्राण्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आणि संपूर्ण वनक्षेत्रात प्लॅस्टिक कचरा न करण्याचे कडक आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा – Ashadhi Ekadashi Special Trains: विठूरायाच्या भक्तांसाठी रेल्वेची भेट; आषाढी वारीसाठी पुणे, नागपूर आणि कोल्हापूरवरून सुटणार 'या' विशेष गाड्या

विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवल्यास कॅमेरा होणार जप्त
अलीकडच्या काळात पर्यटकांमध्ये विस्तीर्ण दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि दुर्मीळ पक्षी भयभीत होतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, वनविभागाचा नियम डावलून कोणी ड्रोन उडवताना आढळल्यास तो ड्रोन कॅमेरा थेट जप्त केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

वनसंपदेच्या रक्षणासाठी पर्यटकांना सहकार्याचे आवाहन
विल्सन पॉइंट हे निसर्गाचे अमूल्य लेणे असून, त्याचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यामुळे पर्यटकांनी या शिस्तीचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वन प्रशासनाने केले आहे. निसर्गाचा आस्वाद घेताना वनसंपदेचे नुकसान होणार नाही आणि येथील शांतता बाधित होणार नाही, याची काळजी पर्यटकांनी घेणे गरजेचे आहे. हे एक ‘राखीव वनक्षेत्र’ असल्याने या भागातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी पर्यटकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे वन विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा – Konkan Railway: मांडवी एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; कोकण कन्या तब्बल 8 तास उशिराने, प्रवाशांचा संताप अनावर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number