2038 Asian Games: भारताने जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली छाप पाडण्यासाठी कंबर कसली आहे. 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2036 च्या ऑलिम्पिकसाठी यशस्वी बोली लावल्यानंतर, भारताने आता 2038 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या यजमानपदावरही आपला अधिकृत दावा ठोकला आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) या संदर्भात पावले उचलण्यास सुरुवात केली असून, यामुळे देशातील क्रीडा संस्कृतीला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
आशियाई खेळांसाठी भारताची औपचारिक बोली
द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 2038 च्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी 'ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया' (OCA) कडे आपले स्वारस्य व्यक्त करणारे औपचारिक पत्र पाठवले आहे. चीनमध्ये पार पडलेल्या OCA च्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर प्राथमिक चर्चाही झाली आहे. IOA चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुराम अय्यर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, लवकरच OCA चे एक शिष्टमंडळ भारतातील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यासाठी दौरा करण्याची शक्यता आहे.
यजमानपदाचा क्रम आणि भारताची तयारी
आशियाई क्रीडा स्पर्धांचे आगामी वेळापत्रक आधीच निश्चित झाले आहे. 2026 मध्ये जपान, 2030 मध्ये कतार (दोहा) आणि 2034 मध्ये सौदी अरेबिया (रियाध) येथे या स्पर्धा होणार आहेत. त्यानंतरची 2038 ची रिक्त जागा भरण्यासाठी भारत आता उत्सुक आहे. भारताने यापूर्वी 1951 आणि 1982 मध्ये आशियाई खेळांचे यशस्वी आयोजन केले होते. आता तब्बल 56 वर्षांनंतर या स्पर्धा पुन्हा मायदेशी आणण्याचा भारताचा मानस आहे.
अहमदाबाद ठरणार क्रीडा केंद्र (स्पोर्ट्स हब)
2036 चे ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने अहमदाबादमधील पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भव्य स्पर्धांचे मुख्य केंद्र म्हणून अहमदाबादचा विचार केला जात आहे. विशेषतः 'सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह' आणि जगातील सर्वात मोठे 'नरेंद्र मोदी स्टेडियम' येथे प्रमुख सामने होण्याची शक्यता आहे. याशिवाय, 'सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स' आणि 'EKA अरेना' यांसारख्या आधुनिक संकुलांचा वापर करून भारत आपले आयोजन कौशल्य जगाला दाखवून देण्यासाठी सज्ज होत आहे.