Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : भारतीय मनोरंजन क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचं नाव अव्वल क्रमांकावर घेतलं जातं. तब्बल 18 वर्षे सलग प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या कॉमेडी शोने अनेक पात्रांना घराघरात लोकप्रिय केलं. दयाबेन, जेठालाल, मेहता साहेब ते सुंदरलाल ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. दयाबेन बराच काळ मालिकेत दिसत नसली तरी तिची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही.
मात्र दीड दशकाच्या प्रवासात या कार्यक्रमात अनेक उलथापालथही झाल्या. वेळोवेळी कलाकार बदलले, काहींनी स्वतःहून शो सोडला तर काहींनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत दूर जाण्याचा निर्णय घेतला. आर्थिक व्यवहारांपासून शोषण आणि लैंगिक छळाच्या आरोपांपर्यंत अनेक मुद्द्यांमुळे हा शो विविध वादांच्या भोवऱ्यात अडकला. परिणामी अनेक जुने आणि लोकप्रिय चेहरे मालिकेतून बाहेर पडले.
सध्या शोमध्ये नवीन कलाकारांची फळी आहे. टप्पू सेना ज्या मुलांपासून सुरू झाली होती, ते कलाकार आता शोचा भाग नाहीत. मोठ्या प्रमाणावर झालेले बदल आणि जुन्या चेहऱ्यांची गैरहजेरी यामुळे गेल्या काही काळापासून मालिकेचा टीआरपी कोसळत असल्याची आणि शो लवकरच बंद होणार असल्याची चर्चा मनोरंजन विश्वात रंगत होती.
दरम्यान, या अफवांवर अखेर स्वतः निर्माता असित मोदी यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘इंडियन टेलिव्हिजन अकादमी’च्या 25 व्या वर्षगाठ सोहळ्यात ते म्हणाले की, शो बंद करण्याचा कोणताही विचार नाही. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि स्वतःची क्षमता जोपर्यंत आहे, तोपर्यंत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रेक्षकांसाठी नियमितपणे सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे चाहत्यांमध्ये पसरलेली गोंधळाची स्थिती काही प्रमाणात दूर झाली असून, मालिका तत्काळ ऑफ-एअर होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.