Satyajeet Tambe: ‘नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग’ प्रकल्प रद्द करण्याच्या हालचालींवरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. “हा प्रकल्प रद्द करू नका, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू,” असा थेट आणि कडक इशारा अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे. नाशिकच्या विकासासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प असून, तो कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार तांबे यांनी घेतला आहे.
या संदर्भात प्रशासनाला आणि रेल्वे विभागाला सुनावताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, “रेल्वेचे प्रकल्प हे काही एक-दोन दिवसांचे किंवा 10-20 वर्षांचे नसतात. हे प्रकल्प पुढील 100 वर्षांचे भविष्य डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जातात. 100 वर्षांतून कधीतरी एकदा असा मोठा रेल्वे प्रकल्प आपल्या भागाला मिळत असतो. असे असताना जर आज हा प्रकल्प रद्द केला, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत.”
नाशिककरांना गांभीर्य ओळखण्याचे आणि लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन
आमदार तांबे यांनी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना या हक्काच्या लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने या विषयावर पोटतिडकीने बोलत आहोत. नाशिककरांनीही आता या विषयाचे गांभीर्य ओळखणे अत्यंत गरजेचे आहे. या रेल्वे मार्गाचा सर्वाधिक फायदा नाशिकच्या औद्योगिक आणि एकूणच सर्वांगीण विकासाला होणार आहे. त्यामुळे जर प्रशासनाने हा मार्ग रद्द केला, तर आपल्या हक्कासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल आणि मोठे जनआंदोलन उभे करावे लागेल,” असे सांगत त्यांनी जनतेला सज्ज राहण्याचा इशारा दिला.