Iran-USA War: इराणसोबत सुरू असलेल्या टोकाच्या संघर्षाच्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक आणि धक्कादायक विधान केले आहे. “मी दहशतवादी इराणी राजवटीचे उरलेसुरले अवशेष पूर्णपणे नष्ट करण्याचा विचार करत आहे,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांनी सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ‘सामुद्रधुनी’चा (Strait) संदर्भ देत नमूद केले की, या मार्गाचा प्रत्यक्ष वापर करणाऱ्या राष्ट्रांकडेच त्याची जबाबदारी सोपवावी, जेणेकरून तटस्थ राहिलेल्या मित्रराष्ट्रांना वेगाने कृती करण्यास भाग पडेल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे आखाती देशांमधील युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.
‘इराण हा जगातील दहशतवादाचा केंद्रबिंदू’; ट्रम्प यांचा हल्लाबोल
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कडक शब्दांत ताशेरे ओढताना त्याला जगातील दहशतवादाला आश्रय देणारे पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र म्हटले आहे. जे देश सध्या या संघर्षात बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यांना इशारा देताना ट्रम्प म्हणाले की, इराणचे अस्तित्व संपुष्टात आणण्याच्या दिशेने अमेरिका वेगाने वाटचाल करत आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आणि त्यांच्या आक्रमक धोरणांना लगाम घालण्यासाठी अमेरिका आता कोणत्याही थराला जाऊ शकते, असेच संकेत ट्रम्प यांच्या या विधानातून मिळत आहेत.
हेही वाचा – Qatar Airways: कतारमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका; 5 विमानांतून 1600 नागरिक मायदेशी परत
प्रमुख इराणी नेत्यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेचा आत्मविश्वास वाढला
गेल्या 24 तासांत इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी आणि गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब हे इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणचे लष्करी नेतृत्व खिळखिळे झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. ट्रम्प यांचे हे विधान इराणवर होणाऱ्या एका मोठ्या आणि निर्णायक हल्ल्याची पूर्वसूचना असल्याचे मानले जात आहे. यामध्ये कदाचित रणनीतिक शस्त्रास्त्रांचा वापर करून इराणी राजवटीचा संपूर्ण नायनाट करण्याचे उद्दिष्ट असू शकते, अशी चर्चा जागतिक संरक्षण वर्तुळात सुरू झाली आहे.