छत्रपती संभाजीनगर: वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखा आणि चर्चेचा विषय ठरलेला उपक्रम पार पडला. वाळूज महानगर परिसरातील करोडी शिवारात 'पत्नी पीडित पुरुष आश्रम'च्या वतीने 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या पत्नीपीडित पुरुषांनी एकत्र येत पिंपळ वृक्षाचे पूजन केले आणि त्याला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत आपल्या व्यथा मांडल्या.
दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. मात्र, कौटुंबिक कलह, मानसिक त्रास आणि विविध वैवाहिक समस्यांचा सामना करणाऱ्या पुरुषांनी यंदाही पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या मार्गाने आपला आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात वर्षांपासून 'पत्नी पीडित पुरुष आश्रम'तर्फे हा उपक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पुरुषांनी आपल्या वैवाहिक जीवनातील अनुभव आणि समस्यांवर मोकळेपणाने भाष्य केले. अनेकांनी कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, खोट्या तक्रारी आणि सामाजिक दबावामुळे पुरुषांनाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. काहींनी पुरुषांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्नही गांभीर्याने मांडला.
या वेळी आश्रमाचे अध्यक्ष ॲड. भारत फुलारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, हा लढा महिलांविरोधात नसून न्यायव्यवस्थेत महिला आणि पुरुष या दोघांनाही समान न्याय मिळावा, यासाठी आहे. समाजात महिलांच्या समस्या जशा गांभीर्याने घेतल्या जातात, त्याचप्रमाणे पत्नीपीडित पुरुषांच्या समस्यांकडेही संवेदनशीलतेने पाहिले जाण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी यावेळी पुन्हा एकदा करण्यात आली. याशिवाय कौटुंबिक प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी, पुरुषांसाठी समुपदेशन केंद्रे उपलब्ध करून द्यावीत, तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन आणि समाजाचे लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमाची परिसरात मोठी चर्चा रंगली असून, सामाजिक माध्यमांवरही या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या उपक्रमाकडे काहींनी समर्थनाची भूमिका घेतली, तर काहींनी या विषयावर व्यापक सामाजिक चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. मात्र, पत्नीपीडित पुरुषांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जावे, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.