Crime News: कर्नाटकमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या एका माजी सैनिकाच्या संशयास्पद मृत्यूचा धक्कादायक उलगडा बेळगाव पोलिसांनी केला आहे. तब्बल दोन महिन्यांच्या सखोल तपासानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून सलाईनमधून विष देऊन करण्यात आलेली हत्या असल्याचे समोर आले आहे. 46 वर्षीय माजी सैनिक संदीप मंजरगी यांचा मृत्यू हा नियोजित कटाचा भाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात त्यांच्या 40 वर्षीय पत्नी सुमा आणि तिचा 26 वर्षीय प्रियकर पुंडलिक डोंबर यांना अटक करण्यात आली आहे.
2 कोटींच्या विमा रकमेचा मोह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुक्केरी तालुक्यातील घोडागेरी गावचे रहिवासी असलेल्या संदीप मंजरगी यांच्या पत्नीचे तिच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या पुंडलिक डोंबरसोबत अनैतिक संबंध होते. या प्रेमसंबंधात पती अडथळा ठरत असल्याने त्याला कायमचे दूर करण्याचा कट रचण्यात आला. यामागे संदीप यांच्या नावावरील तब्बल 2 कोटी रुपयांच्या विमा रकमेवर डोळा असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.
व्यवसायातील ओळखीतून वाढले जवळीकचे संबंध
मुख्य आरोपी पुंडलिक हा पूर्वी संदीप यांच्या हॉटेल व्यवसायात भागीदार होता. व्यवसाय बंद पडल्यानंतर तो संदीप यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करू लागला. याच काळात त्याची आणि सुमाची जवळीक वाढली. या संबंधांमधूनच दोघांनी संदीप यांना संपवण्याचा कट आखल्याचे तपासात समोर आले आहे.
अपघाताची संधी साधून रचला मृत्यूचा सापळा
13 मार्च रोजी घटप्रभा परिसरात संदीप यांच्या दुचाकीला किरकोळ अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच घटनेची संधी साधत आरोपींनी त्यांची हत्या करण्याचा अंतिम डाव आखला. पोलिसांच्या तपासानुसार, रुग्णालयातील प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने संदीप यांच्या सलाईनच्या बाटलीत कीटकनाशक मिसळण्यात आले. उपचार सुरू असतानाच विष शरीरात गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
संशयातून उलगडले हत्येचे गूढ
सुरुवातीला हा मृत्यू अपघातानंतर झालेली नैसर्गिक घटना मानली जात होती. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर सुमाच्या बदललेल्या वर्तनामुळे आणि तिच्या प्रेमसंबंधांबाबत मिळालेल्या माहितीमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाच्या न्यायवैद्यकीय तपासासाठी न्यायालयाची परवानगी घेत गुरुवारी संदीप यांचा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्यात मदत केल्याचा संशय असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.