Ketan Agrawal Death Case: पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अग्रवाल कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू होती. मात्र, सियाचे आधीच चेतनवर प्रेम होते. साखरपुडा झालेला असल्याने लग्न मोडून प्रियकरासोबत पळून गेल्यास समाजात आपल्या कुटुंबाची मोठी बदनामी होईल, अशी भीती सियाला वाटत होती. याच भीतीपोटी तिने आपल्या प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी होणारा पती केतनलाच कायमचे संपवण्याचा अंगावर काटा आणणारा निर्णय घेतला. सध्या न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
1 आठवड्यात 2 वेळा रचला सापळा
केतनला संपवण्यासाठी सियाने अत्यंत थंड डोक्याने नियोजन केले होते. सुरुवातीला तिचा बाली येथे जाण्याचा बेत अयशस्वी ठरल्यानंतर, तिने 14 जून रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी धाडस न झाल्याने हा कट अपूर्ण राहिला. यानंतर, 19 जून रोजी कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्याचे ठरले असताना, सियाने मुद्दाम एक दिवस आधी म्हणजेच 18 जून रोजी केतनकडे लोहगडला ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन आधीच तिथे दबा धरून बसला होता. किल्ल्यावर फिरत असताना केतन पुढे जाताच, चेतनने पाठीमागून येऊन सियाच्या मदतीने केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
बहिणीचा संशय आणि सीसीटीव्ही फुटेजने फुटले बिंग
सुरवातीला केतनचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा बनाव सियाने रचला होता. मात्र, केतनच्या अंत्यविधीनंतर 21 जून रोजी कुटुंबाने घटनास्थळाची पाहणी केली आणि पोलिसांकडे संशय व्यक्त केला. यादरम्यान सिया जेव्हा सांत्वनासाठी केतनच्या घरी आली, तेव्हा केतनची बहीण संजना हिने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. "किल्ल्यावर नेमके काय घडले? पाय कसा घसरला? फोटो दाखव," अशा प्रश्नांवर सिया निरुत्तर झाली आणि पोलिसांचा संशय बळावला.
तपासादरम्यान पोलीस यंत्रणेने तांत्रिक पुरावे गोळा केले. सिया आणि चेतनच्या कॉल रेकॉर्ड्स (CDR) मधून समोर आले की, गेल्या 1 वर्षात त्यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवर संपर्क झाला होता आणि त्यांनी 300 हून अधिक तास संवाद साधला होता. केतनच्या मृत्यूच्या दिवशी चेतनने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःचा फोन पुण्यातील मार्केटयार्ड येथील दुकानात कामगाराकडे ठेवला होता, जेणेकरून त्याचे लोकेशन तिथे दिसेल. मात्र, लोहगड येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घातलेला एक तरुण सियाला काहीतरी खुणावताना दिसला. संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेने चेतनला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच, या संपूर्ण क्रूर कटाचा पर्दाफाश झाला.