ODI World Cup 2027: क्रिकेटप्रेमींसाठी 2017 चा एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) अत्यंत विशेष ठरणार आहे. आयसीसीने (ICC) या स्पर्धेसाठी जुन्या आणि लोकप्रिय रचनेचे पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा साधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2027 या कालावधीत खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशांकडे या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद सोपवण्यात आले आहे. 2003 नंतर प्रथमच आफ्रिकन खंडात विश्वचषकाचे आयोजन होत असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
10 नव्हे, तर 14 संघ भिडणार; पाहा काय आहे 'सुपर 6' फॉरमॅट
2027 मध्ये आयसीसी एकूण 14 संघांना संधी देणार आहे. या संघांची प्रत्येकी 7 संघांच्या दोन गटांत विभागणी केली जाईल. गट फेरीनंतर दोन्ही गटांतील अव्वल तीन संघ 'सुपर 6' (Super 6) फेरीत प्रवेश करतील. या फेरीतील सर्वोत्तम कामगिरी करणारे चार संघ उपांत्य फेरीत (Semi-finals) पोहोचतील आणि त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. ही जुनी रचना स्पर्धेतील चुरस अधिक वाढवणारी ठरेल.
यजमानपद आणि पात्रतेचे निकष
यजमान राष्ट्र म्हणून दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांचे स्थान आधीच निश्चित झाले आहे. मात्र, नामिबिया हा सहयोगी सदस्य असल्याने त्यांना पात्रता फेरीतून आपली जागा निश्चित करावी लागेल. उर्वरित संघांची निवड आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीनुसार (ODI Rankings) केली जाईल, ज्यासाठी मार्च 2026 ही 'कट-ऑफ' तारीख निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील बहुतांश हाय-प्रोफाईल सामने दक्षिण आफ्रिकेत खेळवले जाणार असून नामिबियाला प्रथमच यजमानपदाचा मान मिळाला आहे.
हेही वाचा – BCCI Central Contracts: बुमराहसाठी BCCI बदलणार नियम; A+ श्रेणी रद्द, तरीही 7 कोटींचे मानधन मिळणार?
दक्षिण आफ्रिकेतील 'या' 8 शहरांत रंगणार सामने
विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने एकूण 8 शहरांची निवड केली आहे. यामध्ये जोहान्सबर्ग, केप टाउन, डर्बन, सेंच्युरियन, गकेबेर्हा, ब्लोमफॉन्टेन, ईस्ट लंडन आणि पार्ल यांचा समावेश आहे. याशिवाय झिम्बाब्वेमधील हरारे स्पोर्ट्स क्लब आणि नामिबियातील विंडहोक येथेही काही महत्त्वाचे सामने होतील. भारतीय संघ आपले सामने कोणत्या शहरात खेळणार, हे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.