Nashik TCS Case: टीसीएस कंपनीतील कर्मचारी छळ आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी रझा मेमनच्या पापाचा घडा आता भरू लागला आहे. अटक झाल्यानंतर आता एका चौथ्या पीडित तरुणीने धाडस दाखवून रझा मेमनच्या विकृत वागणुकीचा पाढा वाचला आहे. प्रशिक्षणापासून ते लग्नानंतरच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत मेमनने कशा प्रकारे छळ केला, याची सविस्तर माहिती पीडितेने दिली आहे.
प्रशिक्षणापासूनच छळाला सुरुवात
पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, मे 2023 मध्ये ती प्रशिक्षण घेत असताना रझा मेमनने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोडी विचारण्याच्या बहाण्याने त्याने संपर्क वाढवला आणि "हे आपल्या दोघांतच राहू दे" असे सांगून तिला मेसेज करण्यास भाग पाडले. ती नवीन असल्याने सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले, मात्र मेमनची मजल वाढू लागली.
स्पर्श करण्याचा प्रयत्न आणि अश्लील शेरेबाजी
पीडितेने आरोप केला आहे की, रझा मेमन वारंवार तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. ती एकटी असताना तिच्याकडे टक लावून पाहणे आणि अश्लील भाषेत बोलणे हे त्याचे रोजचेच काम झाले होते. पीडितेचे नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न झाल्यानंतरही हा त्रास थांबला नाही. उलट, तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल तो अत्यंत खालच्या थराचे आणि अपमानकारक प्रश्न विचारून तिला मानसिक त्रास देऊ लागला.
बदनामीचा कट आणि कामाचा दबाव
जेव्हा पीडितेने या त्रासाला विरोध केला, तेव्हा रझाने सूडबुद्धीने तिची बदनामी करण्यास सुरुवात केली. एका सहकाऱ्यासोबत तिचे नाव जोडून ऑफिसमध्ये अफवा पसरवण्यात आल्या. इतकेच नाही तर तांत्रिक छेडछाड करून तिच्यावर कामाचा प्रचंड ताण वाढवण्यात आला.
वरिष्ठांकडून मदतीऐवजी अपमान
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने वरिष्ठ अधिकारी अश्विनी चैनानी यांच्याकडे तक्रार केली असता, तिला मदत मिळण्याऐवजी अपमानास्पद वागणूक मिळाली. "तुला बातम्यांमध्ये यायचे आहे का?" असा प्रश्न विचारून तिची तक्रार दाबण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा पीडितेने केला आहे. सध्या पोलिसांनी रझा मेमनला बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. एकामागून एक पीडिता समोर येत असल्याने या रॅकेटमध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.