Donald Trump : ‘…त्यांना धडा शिकवू’; तेलाच्या वाढत्या किमतींवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रराष्ट्रांवर संताप

'हॉर्मुझ सामुद्रधुनी'मधील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मदत करण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रांवर ट्रम्प यांनी सडकून टीका केली आहे.

Donald Trump : ‘…त्यांना धडा शिकवू’; तेलाच्या वाढत्या किमतींवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा मित्रराष्ट्रांवर संताप

Donald Trump On NATO: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींसाठी नाटो (NATO) सदस्य राष्ट्रांना थेट जबाबदार धरले आहे. ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’मधील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मदत करण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रांवर ट्रम्प यांनी सडकून टीका केली आहे. “हे लोक भित्रे आहेत आणि आम्ही त्यांना नक्कीच लक्षात ठेवू,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला असून, यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

‘नाटो’ केवळ कागदी वाघ; ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वरून प्रहार
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नाटो राष्ट्रांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय नाटो ही केवळ एक निष्प्रभ संस्था किंवा कागदी वाघ आहे. अण्वस्त्रसज्ज इराणला रोखण्यासाठीच्या लढ्यात सहभागी होण्याची या राष्ट्रांची अजिबात इच्छा नव्हती.” जपान आणि दक्षिण कोरियासारख्या देशांनीही इराणविरुद्धच्या संघर्षात अमेरिकेला अपेक्षित पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी नमूद केले. इराणने आखाती देशांमधील ऊर्जा पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेल उत्पादनात मोठी घट झाली आहे. ट्रम्प यांच्या मते, हॉर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली ठेवणे ही एक साधी लष्करी मोहीम आहे, परंतु नाटो राष्ट्रे यामध्ये मदत करण्यास नकार देत आहेत. “जेव्हा हा लढा लष्करीदृष्ट्या जिंकला गेला आहे, तेव्हा हे देश केवळ तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल तक्रार करत आहेत, पण जबाबदारी घेण्यास तयार नाहीत,” असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.

हेही वाचा – US Report On Pakistan : आता अमेरिकेला इराण नाही तर पाकिस्तानपासून धोका, गुप्तचर अहवालातून धक्कादायक माहिती समोर

‘हे युद्ध अमेरिकेचे, नाटोचे नाही’; युरोपीय राष्ट्रांची भूमिका 
ट्रम्प यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक युरोपीय राष्ट्रांनी या युद्धात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “हा संघर्ष अमेरिका आणि इराणमधील असून तो नाटोचा भाग नाही, त्यामुळे आम्ही आमचे सैन्य तैनात करणार नाही,” अशी भूमिका या देशांनी घेतली आहे. याउलट, इराणने स्पष्ट केले आहे की, ते केवळ अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांची वाहतूक रोखतील. मित्रराष्ट्रांच्या या ‘अलिप्त’ धोरणामुळे ट्रम्प कमालीचे संतापले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number