Mumbai Water Cut: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात मुंबईकरांना आता पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या नवीन जलवाहिनीच्या कामामुळे येत्या 5 मे (मंगळवार) सकाळी 10 वाजेपासून ते 6 मे (बुधवार) सायंकाळी 4 वाजेपर्यंत मुंबईतील 6 वॉर्डांमध्ये तब्बल 30 तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
पाणीकपातीचे मुख्य कारण
वडाळ्यातील अमर महाल ते प्रतीक्षा नगर दरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्याचे आणि बोगद्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. हा 1800 मिमी व्यासाचा नवा बोगदा परळ आणि ट्रॉम्बे येथील जलाशयांना जोडला जाणार आहे. या तांत्रिक कामासाठी तुर्भे येथील उच्च आणि निम्न स्तरावरील जलाशयांतून होणारा पुरवठा तात्पुरता थांबवावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या विभागांना बसणार फटका (30 तास पुरवठा बंद)
कुर्ला (L वॉर्ड): नेहरू नगर, शिव सृष्टी, चुनाभट्टी, लोकमान्य टिळक टर्मिनस परिसर, कुरेशी नगर आणि टिळक नगर.
परळ-शिवडी (F/दक्षिण वॉर्ड): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जेरबाई वाडिया मार्ग, हिंदमाता, लालबाग आणि गॅस कंपनी गल्ली परिसर.
माटुंगा-वडाळा (F/उत्तर वॉर्ड): प्रतीक्षा नगर, शीव (पूर्व-पश्चिम), वडाळा ट्रक टर्मिनस आणि संजय गांधी नगर.
घाटकोपर-विक्रोळी (N वॉर्ड): विद्याविहारसह संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत होईल.
चेंबूर-गोवंडी (M/पूर्व व पश्चिम): मानखुर्द, चेंबूर आणि गोवंडी या भागांतही पाण्याचा तुटवडा जाणवेल.
5 ते 6 मे रोजीची स्थिती
महापालिकेच्या या नियोजित कामामुळे मुंबईच्या पूर्व उपनगरासह दक्षिण मुंबईतील काही महत्त्वाच्या वस्त्यांमध्ये पाण्याचा टिपूसही येणार नाही. कामाचा आवाका मोठा असल्याने 30 तासांनंतरच पुरवठा पूर्ववत होईल. पाणीकपातीच्या या काळात नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. 6 मे रोजी संध्याकाळनंतर पुरवठा सुरू होईल, मात्र दाब कमी असण्याची शक्यता आहे, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.