Iran-Israel Conflict: मध्यपूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले असून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या प्रदेशातील आकाश 'नो फ्लाय झोन' बनले आहे. या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर झाला आहे. शनिवार, 28 फेब्रुवारीचा दिवस भारतीय प्रवाशांसाठी कमालीचा गोंधळाचा ठरला. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमानांना हवेतूनच माघारी फिरावे लागले. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेट सारख्या प्रमुख विमान कंपन्यांनी त्यांच्या सेवांबाबत तातडीने आपत्कालीन सूचना (Advisory) जारी केल्या आहेत.
एअर इंडियाचे विमान हवेतूनच वळवले
28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी दिल्लीहून तेल अवीवला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-139 मधील प्रवाशांसाठी हा अनुभव धक्कादायक होता. इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र (Airspace) बंद करण्याची घोषणा करताच, सुरक्षेच्या कारणास्तव विमानाला तातडीने भारतात परत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. एअरलाइनने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, 'प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, म्हणून विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे.' एअर इंडियाने सध्या मध्यपूर्वेतील सर्व संवेदनशील ठिकाणांसाठीची विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे.
इंडिगो आणि स्पाइसजेटची उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल
मध्यपूर्वेतील बिघडलेली परिस्थिती पाहता, भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने कडक पावले उचलली आहेत. इंडिगोने मध्यपूर्वेकडे जाणारी आणि तिथून येणारी सर्व उड्डाणे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या विमानाची स्थिती ऑनलाइन तपासण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे, स्पाइसजेटने दुबई हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे उड्डाणांवर परिणाम झाल्याची पुष्टी केली असून, प्रवाशांच्या मदतीसाठी 24×7 हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
कतार एअरवेजसह आंतरराष्ट्रीय उड्डाणे विस्कळीत
हे संकट केवळ भारतीय विमान कंपन्यांपुरते मर्यादित नाही, तर जागतिक स्तरावर त्याचे परिणाम दिसत आहेत. कतार एअरवेजने दोहा येथून चालणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केल्या आहेत. 'फ्लाइटराडार24' नुसार, इराण, इस्रायल आणि कतारचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे युरोप आणि आशियाला जोडणारे हवाई मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता लांबच्या मार्गांचा वापर करावा लागत आहे, ज्यामुळे इंधनाचा वापर आणि प्रवासाचा वेळ दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे.